के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;‘फुलेवाडी’ची खंडोबा ‘अ’ वर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:55 PM2020-01-15T12:55:27+5:302020-01-15T12:56:53+5:30
अॅग्म्यु रिचर्डच्या एकमेव गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर खंडोबा ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळवर २-० अशी मात केली.
कोल्हापूर : अॅग्म्यु रिचर्डच्या एकमेव गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर खंडोबा ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळवर २-० अशी मात केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ‘फुलेवाडी’ व ‘खंडोबा-‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत पूर्वार्धात चूरस निर्माण केली. यात ‘फुलेवाडी’कडून मिशेल, अनिकेत वरेकर, रोहीत मंडलिक, प्रतीक सावंत, तर खंडोबाकडून कपील शिंदे, सागर पोवार, अजिज मोमीन, विकास बहारे यांनी आक्रमक व वेगवान चढाया केल्या; मात्र दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही.
उत्तरार्धात फुलेवाडी संघाने खेळात बदल करीत वेगवान चढाया आणि शार्ट पासिंगवर भर दिला. या बदलामुळे ४७ व्या मिनिटास ‘फुलेवाडी’ संघाकडून अॅग्मु रिचर्ड याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर खंडोबाकडून कपील शिंदे, अजिज मोमीन यांनी सामन्यांत बरोबरी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र यात अखेरपर्यंत यश आले नाही; त्यामुळे हा सामना ‘फुलेवाडी’ संघाने १-० असा जिंकला.
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात ‘खंडोबा-‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळचा २-० असा पराभव केला. ‘खंडोबा-‘ब’कडून दिग्विजय आसणेकर, प्रथमेश पाटील, मंदार पाठक यांनी, तर संध्यामठकडून योगेश सरनाईक, आशिष पाटील, स्वराज्य सरनाईक, विराज साळोखे यांनी वेगवान चढाया केल्या. ‘खंडोबा-‘ब’कडून हर्षद शिंदे याने ४० व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यांच्या उत्तरार्धात बरोबरी साधण्यासाठी संध्यामठकडून जोरदार प्रयत्न झाले; मात्र त्यांना बरोबरी साधण्यात यश आले नाही. याउलट ‘खंडोबा-‘ब’कडून ऋदेश मांडरेकर याने ७१ व्या मिनिटास गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. याच जोरावर सामनाही ‘खंडोबा-‘ब’ने जिंकला.