शिरोलीत २४ पासून कबड्डी महासंग्राम
By admin | Published: March 13, 2016 11:45 PM2016-03-13T23:45:40+5:302016-03-14T00:04:02+5:30
आज लिलाव : नव्वद खेळाडूंची होणार निवड; दोन लाखांची बक्षिसे
शिरोली : शिरोली येथे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने २४ मार्चपासून भव्य कबड्डी महासंग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत रोख व वस्तूंच्या रूपात सुमारे दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला कबड्डीची मोठी परंपरा आहे. ग्रामीण भागासह शहरात हा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर प्रो-कबड्डी आणि राज्यस्तरीय महाकबड्डी या व्यावसायिक स्पर्धा गाजत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली कबड्डी पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत आली आहे.
याच व्यावसायिक धर्तीवर जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील कबड्डी वाढावी या उद्देशाने जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर प्रीमियर लीग (केपीएल) कबड्डी महासंग्राम स्पर्धा शिरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर २४ ते २७ मार्च दरम्यान होणार आहे.
चार सिन्थेटिक मॅटवर एलईडीच्या प्रकाशझोतात हे सामने होतील. एकावेळी चार ते पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी असणार आहे. आज, सोमवारी जिल्ह्यातील सुमारे तीनशे खेळाडूंमधून नव्वद खेळाडू लिलाव पद्धतीने घेतले जाणार आहेत.
या स्पर्धेत विजयी संघांना एकतीस, एकवीस, अकरा आणि सात हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे एलईडी टीव्हीही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन शिरोली येथील एकवीरा असोसिएशन यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संभाजी पाटील, रमेश भेंडेगिरी, दीपक पाटील, रघुनाथ पाटील, सचिन कोळी, विक्रम चव्हाण हे आयोजन करीत आहेत. (वार्ताहर)
राष्ट्रीय पातळीवर नुकतीच प्रो-कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. ग्रामीण भागात कबड्डीला चांगले दिवस आले आहेत. कोल्हापूरची कबड्डी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी, जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेळाडूंना संधी मिळणार आहे. यातून खेळाडू लिलाव पद्धतीने घेतले जाणार आहेत. खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.
-प्रा. संभाजी पाटील - सचिव, कोल्हापूर कबड्डी असोसिएशन
शिरोली ही कबड्डीसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या स्पर्धेसाठी नऊ संघ सहभागी झाले आहेत. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रथमच जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. एलईडी प्रकाशझोतात या स्पर्धा होणार आहेत. सुमारे पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी असणार आहे. रोख बक्षिसांबरोबरच एलईडी टीव्ही खेळाडूंना देण्यात येणार आहेत.
-प्रा. रघुनाथ पाटील,
एकवीरा असोसिएट्स