एड्सग्रस्तांच्या मुलांना ‘काबा’चा हात
By admin | Published: February 16, 2015 12:12 AM2015-02-16T00:12:15+5:302015-02-16T00:14:34+5:30
आशादायी चित्र : १२०० बालकांना मिळणार आर्थिक, सामाजिक लाभ
मोहन सातपुते - उचगाव-एचआयव्ही संसर्गित आणि एचआयव्हीनं मृत्युमुखी पडलेल्यांच्या १२०० मुला-मुलींना आता ‘चिल्ड्रेन्स अफेक्टेड बाय एड्स (काबा) या प्रकल्पाच्या वतीने सामाजिक, आर्थिक आणि वैद्यकीय सुरक्षा मिळणार आहे. या उपक्रमामुळे निराधार आणि व्यथित बालकांना उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.
कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्टने बालकांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन ‘कलंक आणि भेदभाव’ दूर करण्याबरोबर बालकांना पोटभर अन्न, वस्तू, निवारा आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यानुसार १२०० मुलांना पोषण आहार, शालेय शिक्षण, आरोग्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. एड्सग्रस्त पालकांच्या निधनानंतर पोरकी झालेली मुले आजा-आजी आणि नातेवाइकांबरोबर राहत आहेत. काही ठिकाणी अशा मुलांना वैद्यकीय औषधांकरिता पैसे मिळत नाहीत, तर शासकीय रुग्णालयात मिळणारी औषधे घेऊन जाण्याकरिताही गाडी खर्चाला पैसा नसतात. अशा स्थितीत एचआयव्हीचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते.
‘काबा’चे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कदम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील काही पॉझिटिव्ह व काही निगेटिव्ह मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण विभागातून या मुलांना शासकीय अनुदान मिळवून दिले जात आहे. काही दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या मुलांना मानसिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात येत आहे.
जिल्हा एड्स नियंत्रण पथक, नेटवर्क आॅफ पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही एड्स ही संघटना व विदान प्रकल्पही या कामामध्ये सहकार्य करीत आहे.
इतर संस्थांचीही मदत
‘विदान प्रकल्प’ यामध्ये एचआयव्ही संसर्गित बालकांना पोषण आहार व शालेय साहित्य पुरविण्याचे काम करीत आहे. तसेच अशा मुलांचे संगोपन होण्याकरिता निरपेक्षवृत्तीने कार्य करीत आहे. निराधार मुलांना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘विहान’ प्रयत्नशील आहे.
लोटस मेडिकल फाउंडेशन
अशा मुलांसाठी पोषण आहाराची सोय करण्यात येत आहे. अशा मुलांना वेळेवर पोषण आहार दिला, तर त्यांची प्रकृती चांगली होते. एआरटी या औषधांची मात्रा, त्याचप्रमाणे चांगला पोषण आहार मिळाला पाहिजे म्हणून संस्था या मुलांच्या कार्यात सहभाग घेत आहे.