‘कडकनाथ' फसवणूकप्रकरणी मतदानावर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:46 PM2019-10-14T18:46:10+5:302019-10-14T18:48:12+5:30
सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही, तर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कुटुंबांच्या वतीने २५ आॅक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर राज्यपाल यांनी सामूहिक आत्महत्या करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. याचबरोबर कंपनीच्या लोकांनी कागदपत्रांमध्ये फेरफार, अंडी व खाद्य खरेदी-विक्रीतून अपहार केला आहे; त्यामुळे त्यांना लवकर अटक करण्यात यावी.
शिष्ठमंडळामध्ये कॉ. दिग्विजय पाटील, विजय आमते, जिशान गोलंदाज, संदीप पाटील, उदय पाटील, बबन मुल्लानी, सागर दिंडे, अशोक नायकवडी, जीवन कांबळे, आनंदा खोत, बाळकृष्ण शिरसटे, आदी सहभागी होते.
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा निषेधार्ह
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना पोलीस प्रशासनाने चार जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्याचा कोल्हापूर जिल्हा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे निषेध करण्यात आला.