कदमवाडी शोकाकुल
By Admin | Published: January 4, 2015 01:03 AM2015-01-04T01:03:10+5:302015-01-04T01:21:54+5:30
अंजना नामदेव कांबळे यांचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : कुलदैवत पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविक अंजना नामदेव कांबळे यांचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच कोल्हापुरातील कपूर वसाहत (कदमवाडी) येथे शोककळा पसरली.
अंजना कांबळे यांच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुलगे रमेश व राजू आहेत. त्यांच्यासोबत त्या कपूर वसाहतीमध्ये दहा बाय पंधराच्या छोट्याशा घरामध्ये राहत होत्या. दोन्ही मुले पेंटिंगचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. जानेवारी महिन्यामध्ये पालीच्या खंडोबाच्या यात्रेस वसाहतीमधील सुमारे ५० ते ६० महिला व पुरुष दरवर्षी जात असतात. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविक पालीला गेले आहेत. आज, शनिवारी सकाळीच अंजना कांबळे शेजारील महिलांसोबत पालीला गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल कपूर वसाहतीमध्ये आले. पोलीस पाहून येथील लोक बिथरले. पोलिसांनी अंजना कांबळे यांच्या घराची विचारपूस केली व ते थेट त्यांच्या घरी पोहोचले. घरामध्ये रमेश, त्यांचा भाऊ राजू व बायका-मुले होती. घरातील वातावरण खेळीमेळीत होते. पोलिसांनी त्यांना पालीच्या यात्रेत हत्तीच्या हल्ल्यामध्ये तुमच्या आईचा मृत्यू झाल्याचे सांगताच घरामध्ये या दोघा मुलांसह बायका-मुलांनी टाहो फोटला. आक्रोश ऐकून वसाहतीमधील इतर लोकांनी कांबळे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मुले व नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पालीकडे रवाना झाले.
येतो म्हणून गेल्या पण...
अंजना कांबळे गेली दहा वर्षे पालीच्या यात्रेला जातात. सकाळी चहा घेऊन घरातील दोन्ही मुलांचा, सुना व नातवंडांचा निरोप घेऊन त्या बाहेर पडल्या. गल्लीतील इतर महिलांना त्या हसत-खेळत ‘येतो’ म्हणून गेल्या होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच वसाहतीमधील महिला त्यांची आठवण काढून आक्रोश करीत होत्या. हे दृश्य पाहून संपूर्ण वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.