कागल-भुदरगड अंतर कमी होणार
By admin | Published: December 17, 2015 12:48 AM2015-12-17T00:48:58+5:302015-12-17T01:20:58+5:30
वाघापूर पूल वाहतुकीसाठी सज्ज : प्रवाशांना होणार फायदा; भुदरगडमधील ५0 गावे मुरगूडशी जोडणार
अनिल पाटील-- मुरगूड -कागल व भुदरगड या दोन तालुक्यांना जोडणारा मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्णत्वास गेल्याने वाहतुकीस तो सज्ज झाला आहे. काही दिवसांतच वाहतुकीसाठी तो खुला केला जाईल. यामुळे भुदरगड तालुक्यातील ५0 गावे मुरगूड शहरांशी जोडली जाणार असल्याने प्रवाशांना या पुलाचा फायदा होणार आहे. या पुलामुळे नदीतून, नावेतून होणाऱ्या धोकादायक वाहतुकीला पूर्णविराम मिळणार आहे.भुदरगड तालुक्यातील वाघापूर, कुर, व्हनगुती या गावांसह अन्य गावांतील लोकांना मुरगूडला यायचे असल्यास मुधाळतिट्टामार्गे फिरून यावे लागत होते. पर्यायाने हे लोक मुरगूडला पर्याय गारगोटीचा वापर करत होते. मुरगूडचा आठवडी बाजार प्रसिद्ध असल्याने वाघापूर पट्ट्यामध्ये भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना होणारी अडचण तसेच वाघापूर येथील प्रसिद्ध मंदिर जोतिर्लिंगाची यात्रा व उपस्थित भाविकांची कुचंबणा लक्षात घेऊन हा पूल व्हावा यासाठी तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक व तत्कालिन आमदार के. पी. पाटील यांनी प्रयत्न करून पुलाबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला.या पुलासाठी शासनाने साडेसात कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष पूल बांधण्यासाठी मुरगूड व वाघापूर गावापर्यंतचे रस्ते करणे यासाठी निधीचा वापर करण्यात आला. अत्यंत युद्धपातळीवर आकर्षक अशा पुलाचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. दोन्ही बाजूला रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. या रस्त्यामध्ये वाघापूर व मुरगूडमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मध्यंतरी या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी धाव घेऊन आंदोलन करून बांधकाम बंद पाडले होते. त्यानंतर पाटबंधारे व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीशेतकऱ्यांबरोबर चर्चा करुन सर्व बाधीत शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिले. रस्त्याचे काम यामुळे खोळंबले होते. पण पुन्हा वेगाने ते सुरु झाले आहे.पुलाच्या उभारणीपूर्वी वाघापूर, कुर, व्हनगुत्ती या गावांतून मुरगूडला शाळेसाठी येणाऱ्या मुलांना व अन्य प्रवाशांना वाहतुकीसाठी जि. प. मार्फत नाव देण्यात आली होती.वेदगंगेतून या नावेतून मुले
धोकादायक प्रवास करीत होते. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
त्यानंतर भुदरगड व कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधी या पुलासाठी प्रस्ताव तयार
करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना भाग पाडले. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केल्यामुळे चर्चेत राहिलेला हा पूल आता पूर्णत्वास गेला आहे.
पुलावरुन वाहतूक सुरू
वाघापूर मुरगूड पुलाच्या रस्त्याचे काम सुरु आहे. पण पुलाजवळ जोड रस्ता काढल्याने पुलावरुन सायकल, मोटारसायकल, छोट्या गाड्या जात आहेत. त्यामुळे गारगोटीकडे जाणाऱ्या लोकांना या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येतो.
मुदाळतिट्टावरुन मुरगूडला अंदाजे १0 कि. मी. फेरा मारुन येण्याऐवजी या पुलाचा वापर करणे सोईचे होईल.
यामुळे आदमापूर येथील बाळूमामा मंदिराजवळ होणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी होईल.