कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ वगळून बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:14+5:302021-08-25T04:30:14+5:30
कोल्हापूर : ज्याला त्याला केवळ कागल, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातच बदली हवी ...
कोल्हापूर : ज्याला त्याला केवळ कागल, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातच बदली हवी असते. परिणामी इतर तालुक्यांवर अन्याय होतो. त्यामुळेच यापुढे विनंती आणि आपसी बदल्या हे चार तालुके वगळून करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या प्रकरणावरून सभेत जोरदार गदारोळ झाला. गडहिंग्लज स्वतंत्र जिल्हा करण्यावरूनही मोठा गोेंधळ उडाला. कोण विभागप्रमुख उपस्थित नाहीत यावरूनच सभेला सुरुवात झाली. गेले १५ दिवस अधिकारी भेटत नाहीत. सीईओंच्या बंगल्यावर आहेत असे सांगतात. परंतु आपण केवळ सुट्टीदिवशी त्यांना बोलावत असल्याचे स्पष्ट केले. महापुराच्या चर्चेनंतर कल्लापाण्णा भोगण यांनी स्थायीमध्ये गाजवलेला मुद्दा पुन्हा काढला. लाच घेताना, कामचुकार म्हणून शिक्षा झालेले अधिकारी, कर्मचारी चंदगडला पाठवले जातात. ते शिक्षेचे माहेरघर झाले आहे. मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तेव्हा गडहिंग्लज जिल्हा स्वतंत्र करा. यावरून सभेत गोंधळाला सुरुवात झाली. राहुल आवाडे यांनी यावेळी रुद्रावतार धारण केला. त्यांना न्याय द्या. परंतु जिल्ह्याचे दोन तुकडे होऊ देणार नाही. भोगण, आवाडे माझे पूर्ण म्हणणे ऐका असे सांगत होते, तर आवाडे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उमेश आपटे, राजवर्धन निंबाळकर आवाडे यांची तर विजय भोजे, हंबीरराव पाटील अरूण इंगवले, जीवन पाटील भोगण यांची समजूत काढत हाेते. हा विषय मताला टाकण्याची मागणी आवाडे यांनी केली. सचिन बल्लाळ यांनीही आमचे दुखणे समजून घ्या असे सांगितले.
या गोंधळातच नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या विषयाला तोंड फुटले. उमेश आपटे यांनी या बदल्यांमध्ये अन्याय झाल्याचे सांगत प्रतिनियुक्त्या रद्द करा अशी सूचना केली. यावेळी निंबाळकर यांनी बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना विचारणा करीत प्रक्रिया चुकीची केल्याचा आरोप केला. परंतु काही तालुक्यात अधिक रिक्त जागा दिसू लागल्याने काही बदल्या रद्द केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. कोणाच्या तरी सांगण्यावरून जर अब्दुल लाट कोविड केंद्र बंद केले तर जिल्हाधिकारी आणि तुमच्या कार्यालयात रुग्ण आणणार असा इशारा विजय भोजे यांनी यावेळी दिला. मनोज फराकटे, विजया पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला.
चौकट
सीईओंनी चालवली सभा
या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली. गडहिंग्लज जिल्हा करण्याच्या मुद्द्यावर अध्यक्ष राहूल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज होती. वंदना जाधव, रसिका पाटील या सभापतींनी काही उत्तरे दिली. सभापती शिवानी भोसले, कोमल मिसाळ उपस्थित होत्या.
चौकट
मी बाहेर जाऊ का?
प्रश्न विचारायला संधी मिळत नसल्याने सदस्य शिवाजी मोरे यांनी मी बाहेर जाऊ का अशी अध्यक्षांना विचारणा केली. सभागृहात चर्चा होते. परंतु, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाऊसिंगजी रोडवरील व्यापारी संकुलाचे काम चार वर्षात सुरू होत नाही ही शोकांतिका आहे असे ते म्हणाले. सतीश पाटील यांनी गडहिंग्लजमधील तयार गाळे लवकर भाड्याने देण्याची मागणी केली.
२४०८२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेत मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र गडहिंग्लज जिल्ह्याच्या विषयावरून गोेधळ उडाला.
छाया नसीर अत्तार