कागल भूमिअभिलेख कार्यालयास टाळे
By admin | Published: July 15, 2016 09:23 PM2016-07-15T21:23:15+5:302016-07-15T22:41:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी
कागल : कागल येथील भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त पदे असल्याने, तसेच जे क र्मचारी आहेत ते वेळेत कामकाज करीत नसल्याने तालुक्यातील जनतेची अनेक कामे प्रलंबित आहेत. गावोगावी तंटे, वाद चिघळत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथे आंदोलन करीत कार्यालयास टाळे ठोकले.
तलाठी, सर्कल यांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन घातलेले कुलूप काढून घ्या, असे सांगितल्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.
येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत अचानक घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावपुर्ण झाले. विविध अडचणी, समस्या मांडण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, महिला आघाडीच्या आशाकाकी जगदाळे, नवल बोते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आले होते. अचानक कार्यकर्ते घोषणा देत आल्याने कर्मचारी वर्ग घाबरतच बाहेर पडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ताळे ठोकले. हा प्रकार समजताच कागल पोलिसही हजर झाले.
भैया माने म्हणाले, येथे कायमस्वरूपी भूमी अभिलेखक निरीक्षक हे पद हवे. आता जे निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे चार-पाच ठिकाणचा पदभार असल्याने सर्व कामे प्रलंबित आहेत. इतर कर्मचारी, अधिकारी पदे रिक्त आहेत. आमदार मुश्रीफांनी आपल्या सत्ताकाळात येथे कायमस्वरूपी हे पद ठेवून कामकाज सुरळीत ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही ही परिस्थिती सांगितली होती. कागल तालुक्यात जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कागल शहराचा सिटी सर्व्हे प्रलंबित आहे, म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तत्काळ येथे पदे द्यावीत; अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करू. यावेळी शिवानंद माळी, प्रकाश गाडेकर यांची भाषणे झाली. आभार नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी मानले. आंदोलनात आशाकाकी माने, रंजना सणगर, संजय चितारी, प्रवीण गुरव यांच्यासह संभाजी कोराणे, इरफान मुजावर, संजय ठाणेकर, सुधाकर सोनुर्ले, गणेश सोनुर्ले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.