Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:46 PM2024-07-06T16:46:48+5:302024-07-06T16:47:10+5:30

'राजकारणात जय-पराजय आम्हाला नवीन नाही'

Kagal MLA Impossible to Exclude Mandlik Group, Sanjay Mandlik warns | Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

म्हाकवे : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. आमच्या गटाला दुर्लक्षित करून कोणालाच आमदार होता येणार नाही. ज्या त्या वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे निवडणुकीबाबत गावागावात चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी शासनाच्या योजना घराघरांपर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्या, असे आवाहन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.

हमिदवाडा, ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींसह मंडलिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मला मिळालेली सहा लाख मते कमी नाहीत. त्यांचे योगदान कदापी विसरून चालणार नाही. राजकारणात जय-पराजय आम्हाला नवीन नाही. त्यामुळे यातूनही नेटाने उभे राहू. आगामी काळात जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेऊ. त्यानंतर कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा बोलावून विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करू, अशी ग्वाहीही मंडलिक यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, विरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, विश्वासराव कुराडे, सत्यजित पाटील, साताप्पा कांबळे, राणाप्रताप सासणे, नंदकुमार घोरपडे, महेश घाटगे, नेताजी पाटील, प्रदीप चव्हाण, संभाजी मोरे, बाळासाहेब चौगुले, भगवान पाटील, विजय भोसले, नामदेवराव मेंडके, दिनेश पाटील, युवराज डाफळे आदी उपस्थित होते.

सहा लाख टन ऊस गाळप उद्दिष्ट

यंदाच्या हंगामासाठी सात ऊसतोडणी यंत्रे उपलब्ध करणार असून, स्थानिक टोळ्या वाढविण्याचाही प्रयत्न आहे. ज्या सभासदांनी शेअर्स येणेबाकी रक्कम भरून कारखान्याच्या विस्तारीकरणास सहकार्य करावे. आपण पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंडलिक यांनी केले.

Web Title: Kagal MLA Impossible to Exclude Mandlik Group, Sanjay Mandlik warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.