कागल, मुरगूड नगरपालिकेत कमळ फुलविणार : घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 12:58 AM2016-10-24T00:58:43+5:302016-10-24T00:58:43+5:30
कागलमध्ये मेळावा : कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानासाठी भाजपात
कागल : निवडणुका आल्या की, सर्वजण आमच्या गटाकडे यायचे, मान द्यायचे, सन्मान द्यायचे आणि नंतर काहीही नाही. मान-सन्मानासाठी आम्ही कितीजणांचे दार ठोठावले या इतिहासात आता आम्हाला जायचे नाही. कोणाच्या रागापोटी, द्वेषापोटी म्हणून हा भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. आमच्या गटाच्या आणि कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानासाठी हा निर्णय घेतला आहे. म्हणून आता कागल-मुरगूड नगरपालिकांमध्ये कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समरजितसिंह रविवारी कागल येथे आले. ग्रामदैवत गैबी पीर, श्री राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सातमोट विहीर येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले.मेळाव्यास श्रीमंत राजे प्रवीणसिंह घाटगे, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब भोसले तसेच मंडलिक गटाचे नगरसेवक भैया इंगळे, संजय घाटगे गटाचे संजय कदम, बॉबी माने, आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की, १९७८, १९८५ मध्ये जो विक्रमसिंहराजेंचा गट होता तो गट मला पुनर्जीवित करायचा आहे. आमच्या गटाला बरेच पराभव स्वीकारावे लागले. येणारा काळ बदलेल म्हणून स्वर्गीय राजेसाहेब आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शाहू आघाडी स्थापन केली. आज त्यांच्या या सहनशीलतेने, त्यागाने हे चांगले दिवस येत असल्याचे सांगितले. कागल-मुरगूड नगरपालिकांमध्ये आघाडी-महाआघाडी चार दिवसांत जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कागल शहराच्या आत्मसन्मानाची ही निवडणूक आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता भविष्याचा विचार करून ही निवडणूक लढवूया. मनोहर पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अतुल जोशी, डॉ. तेजपाल शहा यांची भाषणे झाली.
निकालानंतर पद स्वीकारणार
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, भाजपने खूप मान-सन्मान आम्हाला दिला आहे. स्वर्गीय विक्रमसिंहराजेंना त्यांनी ‘राज्यपाल’पद देण्याची तयारी केली होती. मला वयाच्या ३३ व्या वर्षी ‘म्हाडा’चे अध्यक्षपद देत आहेत. २८ नोव्हेंबरला नगरपालिकेचा निकाल घेऊनच हे पद स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्याआधीच प्रवीणराजे भाजपमध्ये
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, राजे गटाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे आम्हाला मानसन्मान मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादांनी आमच्या गटाचे मार्केटिंग केले. छत्रपती संभाजीराजेंनी सततचा आग्रह धरून पाठबळ दिले. माझे चुलते श्रीमंत प्रवीणसिंहराजेंनी दोन वर्षांपूर्वीच नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मूळ मार्गदर्शक तेच आहेत. माझ्याआधीच त्यांनी प्रवेश केला आहे.