Kolhapur News: कागलला परमनंट आमदाराची नव्हे विकासाची गरज, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:07 PM2023-02-08T17:07:06+5:302023-02-08T17:23:37+5:30
मुश्रीफ यांच्या इच्छाशक्ती अभावी तलावाचे काम रेंगाळले
शशिकांत भोसले
सेनापती कापशी : तीन वर्षापूर्वी या तलावासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या इच्छाशक्ती अभावी तलावाचे काम रेंगाळले. कागल विधानसभा मतदार संघाला परमनंट आमदाराची नव्हे तर परमनंट विकासाची गरज असल्याचे सांगत शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफांचे नाव न घेता टोला लगावला.
बेलेवाडी मासा (ता.कागल) येथे लघुपाटबंधारे तलावाच्या आऊटलेट कामाचा प्रारंभ वेळी ते बोलत होते. या कामाचा शुभारंभ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्यक्षात मंजुरीनंतर तीन वर्षात हा तलाव पूर्ण होणे अपेक्षित होते. या प्रकल्पातील अडचणी दूर करून या कामास गती मिळाली आहे. येत्या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवण्याचा प्रयत्न असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
तलावासाठी पाठपुरवा केल्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी समरजित घाटगे यांचा सत्कार केला. शाहूचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी अभियंता बी.व्ही.अजगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत दत्तात्रय हातकर यांनी तर आभार एकनाथ गोरूले यांनी मानले. यावेळी राजाभाऊ माळी, एकनाथ गोरुले, महादेव पाटील, सदाशिव हातकर, आनंदा हातकर महादेव घाळी, अण्णा कांबळे ,कृष्णात गोरुले, रामचंद्र तांबेकर आदी उपस्थित होते.