कागल पालिका ‘स्वच्छ भारत’ अवॉर्डच्या शर्यतीत
By Admin | Published: May 26, 2016 09:38 PM2016-05-26T21:38:40+5:302016-05-27T00:25:46+5:30
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार : जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले नाव; आठ जूनला होणार मूल्यमापन
कागल : शहरे आणि निमशहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा निर्गत यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या महापालिका, नगरपरिषदा आणि इतर शासकीय संस्था यांना ‘स्वच्छ भारत स्कॉच अवॉर्ड’ प्रदान करण्यात येतो. यामध्ये ‘क’ वर्ग पालिकांमधून कागल नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. स्कॉच अवॉर्डच्या मूल्यमापन समितीसमोर येत्या आठ जूनला
कागल नगरपरिषद आपल्या कामाचा आढावा सादर करणार असल्याचे नगराध्यक्ष संगीता गाडेकर, पक्षप्रतोद रमेश माळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, मनोहर पाटील, मारुती मदारे, संजय चितारी, नगरसेवक प्रकाश गाडेकर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे उपस्थित होते.
कागल नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून घनकचऱ्यापासून वीज निर्मिती, खत निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. वीज निर्मिती प्रकल्प हा पथदर्शक प्रकल्प आहे. यामुळे वीज निर्मितीबरोबरच खत निर्मिती
होते.
ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन कचऱ्याची पूर्ण निर्गत होते. सध्या या प्रकल्पातून रोज अर्धा मेगावॅट वीज निर्माण होते. याशिवाय हरित कागल स्वच्छ कागल, लोकसंज्ञापन, लोकसहभाग घेत हे विविध प्रकल्प यशस्वी झाल्याने प्रामुख्याने जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी कागल नगरपरिषदेच्या
नावाचे मूल्यमापन करून
स्पर्धेसाठी नाव पाठविले आहे,
असेही रमेश माळी यांनी
सांगितले.
आठ जूनला नगरपालिका आपल्या कामाचे सादरीकरण
केंद्रीय नगरविकास मंत्री एम.
व्यंकय्या नायडू, खनिज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल कतार, यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी यांच्यासमोर करणार असल्याचे मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी सांगितले.
कागल नगरपरिषदेची ही यशस्वी वाटचाल आमदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असे प्रकाश गाडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे कौतुक...
कागल नगरपालिकेने सुरू केलेल्या घनकचऱ्यापासून वीज उत्पादन या प्रकल्पाबद्दल सविस्तर वृत्तांत ‘लोकमत’ने रविवार स्पेशलमधून राज्यभरामध्ये प्रकाशित केला होता. यामुळे राज्यभरातील नगरपालिकांचे पदाधिकारी हा पथदर्शक प्रकल्प पाहण्यासाठी कागलला भेट देत आहेत. याबद्दल नगराध्यक्ष संगीता गाडेकर यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
‘स्कॉच’ पुरस्काराबद्दल...
गुरगाव, हरियाणास्थित ‘स्कॉच’ ही आंतरराष्ट्रीय कंपनी विविध क्षेत्रातील कामांच्या मूल्यमापन-मूल्यांकनासाठी केंद्र व राज्य सरकार यांना सहकार्य करते. स्वच्छ भारत अवॉर्ड २०१६ या केंद्रीय शासन पातळीवरील पुरस्कारासाठी ही कंपनी मूल्यांकन करीत आहे. त्यासाठी देशभरातून ठरावीक निकष पूर्ण केलेल्या नगरपालिकांना निमंत्रित केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, शून्य कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, शौचालये, सार्वजनिक शौचालये, लोकशिक्षण लोकसहभाग आदी मुद्द्यांवर हे मूल्यमापन होईल. पुरस्कारप्राप्त नगरपालिकेला शासन अनुदानाबरोबरच विविध सामाजिक संस्थाही अनुदान देतात.