कागलमधून तुतारी हाती घेत हसन मुश्रीफांना आव्हान देणार?; समरजीतसिंह घाटगेंचं मोजक्या शब्दांत थेट उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:40 PM2024-08-05T21:40:04+5:302024-08-05T21:40:42+5:30
आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Kagal Asselmbly ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षफुटीनंतर साथ सोडलेल्या आमदारांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांकडून भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत आता घाटगे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"माझ्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच चर्चा सुरू आहे. परंतु याबाबतच्या ऑफरला मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माझ्या उमेदवारीच्या सर्व चर्चाही मी माध्यमांवरच बघत आहे," असा खुलासा समरजीतसिंह घाटगे यांनी केला आहे.
दरम्यान, सध्या समरजीतसिंह घाटगे यांनी आपले पत्ते ओपन करण्यास नकार दिला असला तरी आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हसन मुश्रीफांनी काय म्हटलं आहे?
समरजीतसिंह घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळातही सहभागी होणार," असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.