कागल-सातारा सहा पदरीकरणास गती : ई टेंडर प्रक्रिया सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:25 AM2018-03-06T01:25:52+5:302018-03-06T01:25:52+5:30
शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी
सतीश पाटील ।
शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरु आहे. कागल ते घुणकी, कणेगाव ते कराड-मलकापूर तसेच कराड ते सातारा या तीन टप्प्यांत बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा व हस्तांतरीत करा ) या १३३ किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे.
कागल ते सातारा दरम्यानच्या महामार्गावर मोठी शहरे, औद्योगिक वसाहती यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २००६ मध्ये झालेला चारपदरी महामार्गही अपुरा पडत आहे. भविष्याच्या दृष्टीने या महामार्गाची रूंदी वाढवणे गरजेचे बनले असून, यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे तीन हजार कोटींचा सहा पदरीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता इ-टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. काही ठिकाणी वादग्रस्त ठरलेले भूसंपादन झाल्यानंतर २४ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.
कागल ते सातारा या १३३ किलोमीटर अंतरामधील कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते घुणकी पुलापर्यंत ४७ किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा असून यासाठी ९९२.९१ कोटी रुपये, सांगली जिल्ह्यातील कणेगाव ते कराड हा ३९.५ किलोमीटरचा दुसरा टप्पा असून यासाठी ७०७.९० कोटी रुपये तर सातारा जिल्ह्यातील कराड ते सातारा या तिसºया टप्प्यातील ४६.५ किलोमीटर रस्त्यासाठी ११०९.१६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
या आराखड्यानुसार कागल-सातारा १३३ किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरणात सिमेंट काँक्रीट आणि डांबरीकरण होणार आहे. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला २०८ किलोमीटर अंतराचे सेवामार्ग होणार आहेत. मोठे पाच उड्डाणपूल होणार आहेत. यापैकी तीन कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन सातारा जिल्ह्यात उभारले जाणार आहेत. यामध्ये कराड-मलकापूर शहरावरून जाणारा चार किलोमीटर अंतराचा सर्वांत मोठा उड्डाणपूल असेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय पंचगंगा नदीवरील कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रीज, टोप येथील ८२० मीटरचा उड्डापूल , कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलाचा यात समावेश आहे.
महामार्गावर १० मुख्य मध्यम उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सेवामार्ग आणि महामार्ग जोडण्यासाठी छोटी ५० उड्डाणपूल उभारली जाणार आहेत. २५ भुयारी मार्ग करण्यात येणार असून, यामध्ये चौपदरीकरणात केलेल्या काही जुन्या भुयारी मार्गांची उंची वाढवली जाणार आहे, तर महामार्गाखालून व रेल्वे पुलाखालून गेलेल्या ३०५ पाईपलाईनसाठी बोगदे उभारली जाणार आहेत. मुख्य १६ जंक्शन, ७१ लहान जंक्शन, ६७ बसथांबे, ८ वाहनतळ या प्रकल्पात उभारण्यात येणार आहेत. हे १३३ किलोमीटरचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजित असून, चौपदरीकरणातील अनेक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या आराखड्यात केला आहे.
१ चौपदरीकरणात गरज भासेल तिथेच सेवामार्ग केले होते. तेही तीन ते पाच मीटरचे. पण सहा पदरीकरणात महामार्गाच्या दोन्ही बाजूला सात मीटरचे म्हणजे २३ फुटांचे सेवामार्ग होणार आहेत. यामुळे अपघातात घट होईल तसेच वाहतूक सुरळीत होईल.
२ चौपदरीकरण झाले त्यावेळी साडेआठ मीटरचे रस्ते मुख्य महामार्गावर करण्यात आले होते. पण सध्या सहा पदरीकरणात ११ मीटरचे दोन्ही बाजूला रस्ते केले जाणार आहेत.
३ तावडे हॉटेल, कागल, उजळाईवाडी येथील लहान अपुरे भुयारीमार्ग पाडून तेथे नवीन मोठे भुयारीमार्ग उभारण्यात येणार आहेत.
४ उचगाव येथील भुयारीमार्गाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या उड्डाणपुलाखालून कोल्हापुरात प्रवेश होतो. तसेच मुडशिंगी, हुपरी, पट्टणकोडोली या मार्गावर जाणारी मोठी वाहतूक या पुलाखालून जाते. वाहतुकीस हा पूल अपुरा आहे. या ठिकाणी मोठा भुयारीमार्ग होणे गरजेचे आहे.
५ निढोरी फाटा, कागल बस स्टॅन्ड, कणेरीवाडी, नागाव फाटा, अंबप फाटा याठिकाणीही उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.