कागल तालुक्यातील आशांचे मानधन रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:39+5:302021-04-18T04:22:39+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : कोरोनासारख्या महाभयंकर शत्रुसमोर सर्वात पुढे राहून प्रशासनाला सहकार्य करत जनतेची ढाल बनलेल्या आशा ...
दत्ता पाटील म्हाकवे : कोरोनासारख्या महाभयंकर शत्रुसमोर सर्वात पुढे राहून प्रशासनाला सहकार्य करत जनतेची ढाल बनलेल्या आशा स्वयंसेवकांना पाच महिन्यांचे मानधन दिलेले नव्हते. ते मानधन मिळविण्यासाठीही आशांना संघर्ष करावा लागला. त्यानंतर शासनस्तरावरून जि.प.कडे ३ कोटी १० लाख वर्ग झाले. तर गत पंधरवड्यात संबंधित पं.स.कडे हे मानधन वर्ग करण्यात आले; मात्र शासनाकडून अद्याप मानधनच न आल्याचे सांगत कागल पं समितीच्या अधिकाऱ्यांनी वाटप केलेले नाही.
कागलमध्ये २४६ आशा व ११ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांच्या ५ महिन्यांच्या वाढीव मानधनापोटी सुमारे २४ लाखांहून अधिक रक्कम प्राप्त झाली असल्याचेही समजते.
अन्य तालुक्यातील आशांना ही रक्कम मिळाली असून, याबाबत कागलमधील आशांनी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आशांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.
कोरोना काळात आशांनी जोखीम पत्करून दिलेल्या योगदानामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत त्यांच्या मानधनात वाढ केली. त्याप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर २०२० पर्यंत देण्यात आले; मात्र नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत हे वाढीव मानधन थकीत आहे
जिल्हा प्रशासनही झाले आश्चर्यचकीत...
जिल्हा संघटनेच्या आशांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून विचारणा केली. यावेळी आशांचे प्राप्त मानधन संबंधित तालुक्याला वर्ग केल्याचे सांगितले. त्यामुळे कागलमधील आरोग्य विभागाचा कारनाम्यासमोर आला.
"आशांच्या थकीत मानधनाबाबत थेट जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यामुळे हा गैरप्रकार लक्षात आला. मुळात कमी मानधनात काम करणाऱ्या आशांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या असून, शासनाकडून प्राप्त होऊनही वेळेत मानधन न देणे ही बाब खेदजनक आहे.
काँ. शिवाजी मगदूम
लाल बावटा जिल्हा सचिव
गटविकास
अधिकारीही अनभिज्ञच...
आठवड्यापूर्वी जि.प.कडून प्रत्येक तालुक्यांना हे मानधन वर्ग केले आहे; मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिलेली नाही. मानधन जमा झाल्याबाबत काहीही माहीत नसल्याचे गटविकास अधिकारी संसारे यांनी सांगितले.