कागल तालुक्यात मुश्रीफ-मंडलिक गटाचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:08 AM2017-10-18T00:08:16+5:302017-10-18T00:21:02+5:30
कागल : कागल तालुक्यातील२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दहा ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ गटाचे सरपंच, तर संजय मंडलिक गटाचे सात ठिकाणी सरपंच निवडून आले
जहाँगीर शेख ।
कागल : कागल तालुक्यातील२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दहा ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ गटाचे सरपंच, तर संजय मंडलिक गटाचे सात ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. संजय घाटगे गटाचे चार ठिकाणी, तर समरजितसिंह घाटगे गटाचे तीन ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. प्रवीणसिंह पाटील गटाचा एका गावात, तर एक अपक्षही सरपंच म्हणून निवडून आला आहे. एकूण निकालाचे विश्लेषण पाहता मुश्रीफ-मंडलिक गटाने बाजी मारली आहे.
फराकटेवाडी येथे शीतल रोहित फराकटे या मुश्रीफ गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत. येथे मंडलिक-मुश्रीफ आघाडीने सात जागा जिंकल्या आहेत. हणबरवाडी येथे समरजितसिंहराजे गटाचे प्रभाकर शंकर मोहिते हे सरपंचपदासाठी विजयी झाले. या ठिकाणी मंडलिक गटाच्या विरोधात राजे-मुश्रीफ-संजय घाटगे एकत्र आले होते. सर्वच सात जागा त्यांनी जिंकून सत्तांतर घडविले. दौलतवाडी येथे मुश्रीफ गटाचे विठ्ठल रमेश जाधव निवडून आले. येथे मंडलिक-मुश्रीफ आघाडीने सर्व जागा जिंकल्या. करड्याळ येथेही मुश्रीफ-मंडलिक आघाडीने नऊपैकी सात जागा जिंकत सत्तांतर केल.
मुश्रीफ गटाचे विठ्ठल दिनकर टिपुगडे सरपंच झाले. अवचितवाडी येथे मंडलिक गटाचे उत्तम पाटील सरपंच झाले, तर ठाणेवाडी येथे मुश्रीफ-संजय घाटगे-प्रवीणसिंह पाटील गटाची आघाडी होती. येथे पाटील गटाचे अरुण यमगेकर सरपंचपदी विजयी झाले. हसुर बुद्रुक येथे मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध दोन्ही घाटगे असा सामना रंगला. यामध्ये सरपंचपदी मंडलिक गटाचे दिग्विजय पाटील विजयी झाले. मंडलिक-मुश्रीफ आघाडीने ६, तर घाटगे गटाला ३ जागा मिळाल्या. नंद्याळ येथे अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीचा पराभव करीत सरपंचपद मिळविले. येथे सदस्य पदाच्या नऊही जागा मंडलिक-मुश्रीफ गटास मिळाल्या. बामणी येथे मुश्रीफ गटाचे रावसाहेब बापू पाटील सरपंच म्हणून निवडून आले. या ठिकाणी मंडलिक-मुश्रीफ आघाडीस चार जागा, मंडलिक गटास ३, तर राजे गटास २ जागा मिळाल्या. बाळेघोल येथे मंडलिक-मुश्रीफ गटाने सर्वच जागा जिंकत घाटगे गटाकडून सत्ता काढून घेतली. मुश्रीफ गटाच्या सावित्री खतकल्ले सरपंच झाल्या. बेलेवाडी काळम्मा येथेही मुश्रीफ गटाचे सागर यशवंत पाटील हे सरपंचपदी विजयी झाले. येथे मंडलिक-मुश्रीफ गटाने एकत्रित घाटगे गटाचा धुव्वा उडविला. पिराचीवाडी येथे सुभाष पांडुरंग भोसले यांनी सरपंचपदासह सर्व जागा जिंकत मुश्रीफ गटाने किल्ला शाबूत ठेवला. निढोरीत मंडलिक-मुश्रीफ गटाने नऊपैकी सहा जागा जिंकत राजे गटाकडून सत्ता काढून घेतली. येथे सरपंचपदी मुश्रीफ गटाचे देवानंद पाटील जिंकले.
मुगळीत मंडलिक-मुश्रीफ गटाने राजे-घाटगे गटाचा पराभव करीत मंडलिक गटाचे कृष्णात काळू गुरव हे सरपंच झाले. जैन्याळ येथे राजे गटाने मंडलिक-मुश्रीफ आघाडी विरुद्ध सहा जागा जिंकत हौसाबाई बरकाळे या सरपंचपदाच्या उमेदवारासही निवडून आणले, तर व्हन्नाळी हा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात संजय घाटगे गटास यश आले. नीलम सूर्यकांत मर्दाने या सरपंच झाल्या. हमीदवाडा येथेही मंडलिक गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत सुमन जाधव या सरपंचपदाच्या उमेदवारासह १० जागा जिंकल्या.
बोरवडे येथे मुश्रीफ गटाचे गणपतराव फराकटे सरपंच म्हणून निवडून आले. सेनापती कापशी येथे संजय घाटगे-राजे गटाने मंडलिक-मुश्रीफ आघाडीचा नऊ विरुद्ध सहा जागांनी पराभव केला. संजय घाटगे गटाच्या श्रद्धा सतीश कोळी या सरपंच झाल्या. बाचणीतही मुश्रीफ गटाचा पराभव करीत राजे-मंडलिक-संजय घाटगे गटाने सत्ता घेतली. मंडलिक गटाचे निवास महादेव पाटील हे निवडून आले.'
रणदिवेवाडी येथेही सत्तांतर होऊन संजय घाटगे गटाच्या शोभा खोत निवडून आल्या. अर्जुनवाडा येथेही याच गटाचे प्रदीप कुंडलिक पाटील निवडून आले. येथे संजय घाटगे-मुश्रीफ-पाटील-मंडलिक एकत्र होते. बोळावी येथे राजे गटाचे संजय मारूती पाटील विजयी झाले. चिमगावमध्ये मंडलिक गटाच्या रूपाली दीपक अंगज विजयीझाल्या. येथे मंडलिक-मुश्रीफ-पाटील गटाने १० जागा जिंकल्या.आणूर येथे मंडलिक-मुश्रीफ-राजे गटाने ९ जागा जिंकत संजय घाटगेंची सत्ता संपुष्टात आणली. मंडलिक गटाच्या रेखा तोडकर जिंकल्या.
फेरमतमोजणीस नकार
बोरवडे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत गणपतराव फराकटे यांनी प्रतिस्पर्धी संभाजी फराकटे यांच्यावर निसटता विजय मिळविला. संभाजी फराकटे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे हा निकाल लवकर जाहीर झाला नव्हता. ‘तात्यांचे’ काय झाले? अशी तालुकाभर चर्चा सुरू होती. तहसीलदार किशोर घाटगेंनी निकाल स्पष्ट झाला आहे म्हणून फेरमतमोजणीस नकार दिला.
मंडलिक-मुश्रीफ १३ पैकी १० ठिकाणी यशस्वी
यावेळी २६ पैकी १३ ठिकाणी मंडलिक-मुश्रीफ युती विरुद्ध दोन्ही घाटगे गट असा पारंपरिक संघर्ष रंगला. यामध्ये मंडलिक-मुश्रीफ गटाने फराकटेवाडी, दौलतवाडी, करड्याळ, हसूर बुद्रुक, बामणी, बेलेवाडी काळम्मा, निढोरी, मुगळी, चिमगाव, क. सांगाव या दहा गावांत विजय मिळविला, तर सेनापती कापशी, जैन्याळ, बोळावी येथे घाटगे गटास यश मिळाले.