जागा वाटपावरून कागलमध्ये तणाव
By admin | Published: November 15, 2015 01:01 AM2015-11-15T01:01:18+5:302015-11-15T01:05:16+5:30
किरकोळ दगडफेक : पोलीसांचा लाठीमार
कागल : येथे सुरू असलेल्या ग्रामदैवत हजरत गहिनीनाथ गैबी पीर उरुसासाठी खर्डेकर चौकात जागा वाटपावरून निर्माण झालेल्या वादातून आज दुपारी एकच्या सुमारास शहरातील दोन जमाव आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण झाले. जागा वाटप हा तात्पुरता मुद्दा असला तरी ‘संयुक्त गल्ली’ असे वर्चस्व वादाचे स्वरूप या संघर्षामागे असल्याने बघता बघता जवळपास दोनशेजणांचा जमाव जमला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले, तर किरकोळ दगडफेकही झाली.
कागल उरुसाचा शनिवार हा दुसरा दिवस आहे. अजूनही जागा वाटपाचे काम नगरपालिकेचे कर्मचारी करीत आहेत. बॅ. खर्डेकर चौकात जागा देण्यावरून स्थानिक विक्रेते आणि कर्मचारी असा पहिल्यांदा वाद झाला. तेथील एका मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक विक्रेत्यांच्या बाजूने जमा झाले. ही बातमी दुसऱ्या मंडळास समजताच त्यांचेही कार्यकर्ते जमाव करून आले. या दोन्ही संयुक्त गल्ली मंडळामध्ये गेली काही वर्षे सातत्याने वाद उफाळून येत आहेत. दुपारी एक वाजता एक जमाव खर्डेकर चौक परिसरात तर दुसरा जमाव जि. प. जुना दवाखाना परिसरात होता. पोलिसांनी मध्येच कडे केले होते. शिवीगाळ, धमकी तसेच हातात असणाऱ्या काठ्या, हॉकी स्टीक, गज एकमेकांना दाखविण्यात येत होते. या गोंधळातच किरकोळ दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला आणि जमावाला पांगविले. (प्रतिनिधी)