Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफच दमदार, सलग सहाव्यांदा आमदार; वस्तादांचा डाव फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 02:22 PM2024-11-24T14:22:45+5:302024-11-24T14:23:21+5:30

समरजित घाटगे यांचा सलग दुसरा पराभव

Kagal vidhan sabha assembly election result 2024 Hasan Mushrif Damdar in Kagal, sixth consecutive MLA; Sharad Pawar's plot failed | Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफच दमदार, सलग सहाव्यांदा आमदार; वस्तादांचा डाव फेल

Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफच दमदार, सलग सहाव्यांदा आमदार; वस्तादांचा डाव फेल

जे. एस. शेख / बाबासाहेब चिक्कोडे

कागल : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला. मंत्री मुश्रीफ यांचा हा सलग सहावा विजय असून त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे. मुश्रीफ यांना १ लाख ४५ हजार २६९, तर समरजित घाटगे यांना १ लाख ३३ हजार ६८८ मते मिळाली. येथील जवाहर नवोदय विद्यालयात मतमोजणी झाली.

मंत्री मुश्रीफ यांच्या पराभवासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रयत्न केले, पण सामान्य जनतेशी असलेली नाळ आणि पवारांच्या तालमीत शिकलेल्या डावांचा वापर करीत त्यांनी घाटगे यांचे आव्हान परतवून लावले. मात्र, त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळाले नाही. मंत्री मुश्रीफांसारखा बलाढ्य नेता समोर असतानाही समरजित यांनी अटीतटीची लढत दिली, परंतु त्यांचा हा सलग दुसरा पराभव झाल्याने त्यांची मोठी राजकीय पीछेहाट आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे संजय घाटगे निवडणुकीपूर्वीपासूनच होते, तर महायुती म्हणून शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांचाही पाठिंबा होता. असे असले तरी त्यांना फार मोठे मताधिक्य मिळालेले नाही. 

समरजित घाटगे यांनी गृहीत धरलेला अंडरकरंट काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. पहिली फेरी वगळता घाटगे यांना मताधिक्य घेता आले नाही. मुश्रीफ यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीनिहाय वाढत गेले. गडहिंग्लज भागात स्वाती कोरी यांचा फायदा समरजित घाटगे यांना झाला तर उत्तूरमध्ये उमेश आपटे यांचा फायदा मुश्रीफ यांना झाला. मुश्रीफ यांना कागल तालुक्यातून जवळपास साडेसहा हजारांचे मताधिक्य तर गडहिंग्लज, उत्तूर भागात साडेपाच हजारांचे मताधिक्य मिळाले. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सर्वप्रथम या मतदारसंघाच्या उमेदवारी जाहीर झाल्या होत्या. स्वतः शरद पवारांनी लक्ष घातल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा विजय संपादन करून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

विजयाची कारणे

  • मुश्रीफ यांची सामान्य जनतेशी जुळलेली नाळ. पहाटे सहापासून जनतेची कामे करण्याची पद्धत तसेच गावागावांत उभी केलेली त्रिस्तरीय सक्षम कार्यकर्त्यांची फळी.
  • राजकीय मुत्सद्दीपणा आणि अनेक निवडणुकांचा असलेला अनुभव या बळावर त्यांनी जोडण्या लावत शेवटच्या आठवड्यात अंडरकरंटचे वातावरण बदलले.
  • मतदारसंघाचा केलेला विकास आणि मंत्री म्हणून खेचून आणलेली अनेक कामे, योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले.
  • निवडणुकीपूर्वीच त्यांच्याविरुद्ध पाचवेळा निवडणूक लढलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले. तसेच महायुती म्हणून संजय मंडलिक व भाजपा यांनाही प्रचारात सक्रिय केले.


पराभवाची कारणे

  • दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा अभाव. तिसऱ्या व चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांवर विसंबून राहावे लागले. काही गावांत योग्य यंत्रणा उभी करता आली नाही
  • भाजप हा सत्ताधारी पक्ष सोडल्याचा फटका़ जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही म्हणावे तितके पाठबळ दिले नाही. प्रचारातही पक्षीय मर्यादा.
  • टीकात्मक आणि आरोपात्मक प्रचारावर जास्त भर दिला गेला. स्वतः काय करणार? हे प्रभावीपणे लोकांसमोर मांडता आले नाही. मुश्रीफांच्या तुलनेत राजकीय अनुभव कमी पडला.
  • सिद्धनेर्ली येथील दलितांचे जमीन प्रकरण आणि शाहू दूध संघासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप व प्रचार खोडून काढता आला नाही.


या निवडणुकीत एक कपटी व्यक्ती मला व माझ्या कुटुंबाला ईडीच्या माध्यमातून अटक करून स्वतः आमदार होण्याची स्वप्ने पाहत होती. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. किमान यापुढे तरी चांगले काम करण्याची बुद्धी त्यांना देव देवो हीच प्रार्थना. मतदारांचे तसेच तमाम कार्यकर्ते व नेत्यांचे आभार. -हसन मुश्रीफ

उमेदवारांना मिळालेली मते

  • हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) मते.= १,४५,२६९
  • समरजित विक्रमसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) एक लाख ३३ हजार ६८८ -
  • अशोक बापू शिवशरण(बसपा) ६०६ -
  • रोहन अनिल निर्मळे (मनसे) १९१८-
  • धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी) ६०५ -
  • ॲड. कृष्णाबाई दीपक चौगुले (अपक्ष ) ५८-
  • पंढरी दत्तात्रय पाटील (अपक्ष) १६५-
  • प्रकाश तुकाराम बेलवडे (अपक्ष) ७९५-
  • राजू बापू कांबळे (अपक्ष) १५२ -
  • विनायक अशोक चिखले (अपक्ष) ३५५-
  • साताप्पाराव शिवाजीराव सोनाळकर (अपक्ष) २३१९
  • नोटा= ८८६

Web Title: Kagal vidhan sabha assembly election result 2024 Hasan Mushrif Damdar in Kagal, sixth consecutive MLA; Sharad Pawar's plot failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.