मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:12 PM2024-10-11T14:12:05+5:302024-10-11T14:15:31+5:30
Kagal Vidhan Sabha : विधानसभा निवडणूक जवळ येईत तशा कागलच्या राजकारणात रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
Kagal Vidhan Sabha ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कागल मतदारसंघात महाविकास आघाडीकडून समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, एका कार्यक्रमात माजी खासदार संजय मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले, यावेळी 'राज्यात पुन्हा महायुतीचे शासन यावे, हसन मुश्रीफ यांना ताकदीने मदत करा', असंही संजय मंडलिक म्हणाले.
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
दरम्यान, आता माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विधानामुळे कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना मंडलिक म्हणाले, दोन दिवसात निवडूक जाहीर होईल. पुन्हा एकदा राज्यात युतीचं सरकार यावं. या पद्धतीने आमची भूमिका आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना ताकदीने मदत करावी, असं आव्हानही मंडलिक यांनी यावेळी केले.
विरेंद्र मंडलिकांनी विरोधात घेतली होती भूमिका
माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी दोन दिवसापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. कागल तालुक्यातील काही गावांमध्ये बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर 'हसन साहेब, समरजीतराजे...काय काय केलाय तुम्ही, हे विसरणार नाही आम्ही...' हा आशय होता. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता मंत्री हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.
विरेंद्र मंडलिक काय म्हणाले?
कागलविधानसभा मतदारसंघात मुश्रीफसाहेब यांना उमेदवारी दिल्यास अँन्टी इन्कम्बंसीचा फटका महायुतीला बसू शकतो. दहा पैकी आठ मतदार मुश्रीफसाहेब नको म्हणतात त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मुश्रीफसाहेब तुम्ही आता थांबावे असे आवाहन शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक यांनी केले. लोकसभेला कागल तालुक्यातील घटलेल्या मतदानाला जबाबदार धरत मुश्रीफांसह समरजित घाटगे यांच्यावर टीकेची झोड उडवली.
"कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ आणि कागल तालुक्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझे आजोब दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मुश्रीफ यांना आमदार केलं, दोन वेळा मंत्री केलं तरी तुम्ही त्यांच्याच नातवाला विरोध का करता", असा सवालही विरेंद्र मंडलिक यांनी केला.