कडुबाई खरात यांच्या घरासाठी कागलकरांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:43 PM2019-03-31T23:43:19+5:302019-03-31T23:43:23+5:30
कागल : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची गाणी गात लोकप्रबोधन करणाऱ्या कडुबाई खरात ...
कागल : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची गाणी गात लोकप्रबोधन करणाऱ्या कडुबाई खरात यांना घर बांधून देण्यासाठी राजर्षी शाहूंची जनक भूमी असलेले कागलकर पुढाकार घेत आहेत. ही बाब महत्त्वाची आहे. राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचा वारस म्हणून कडुबार्इंचे घर पूर्ण करण्यासाठी हवे ते सहकार्य करू, अशी ग्वाही पुणे म्हाडाचे अध्यक्ष, छ. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील आर.पी.आय.च्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी घरबांधणीसाठी भेटवस्तू योजना राबविली आहे. या माध्यमातून हा निधी उभारणार आहोत. याचा प्रारंभ समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे होते. कडुबाई खरात यांचे घर औरंगाबाद महानगरपालिकेने अतिक्रमण मोहिमेत पाडल्यामुळे त्या बेघर झाल्या आहेत. येथील एका हॉटेलच्या मिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कडुबाई खरात यांनी गीते सादर केली.
समरजितसिहं घाटगे म्हणाले की, कडुबाई खरातसारख्या भगिनी समाज प्रबोधनासाठी नि:स्वार्थपणे काम करतात. आपण एक जागरूक समाज म्हणून त्यांच्या घरासाठी पुढाकार घेऊया. उत्तम कांबळे म्हणाले की, शाहू महाराजांच्या भूमीतून लोकसहभागातून कडुबार्इंना औरंगाबादमध्ये घर बांधून देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला समतेचा संदेश देण्यासारखे आहे.
यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, राज्य सचिव मंगलराव माळगे, बाळासाहेब वाशीकर, चंद्रशेखर कोरे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीचंद पटेल यांचीही भाषणे झाली. यावेळी नंदाताई भास्कर, जयपाल कांबळे, राजेंद्र ठिपकुर्लीकर, विश्वास सरुडकर, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, गुणवंत नागटिळे, विनोद कांबळे, सचिन मोहिते, मनोज गाडेकर, आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर यांनी स्वागत, बी. आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आण्णासो आवळे यांनी आभार मानले.