कागलचा बोटिंग क्लब नव्याने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:25+5:302021-03-08T04:23:25+5:30
कागल : कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेले वर्षभर बंद असलेला कागल बोटिंग क्लब रविवारी नव्याने सुरू करण्यात आला. ...
कागल :
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेले वर्षभर बंद असलेला कागल बोटिंग क्लब रविवारी नव्याने सुरू करण्यात आला. बोटिंग क्लबच्या बोटींचे जलावतरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे माजी महापौर आर. के. पोवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी बोटिंगचा आनंदही लुटला.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेले वर्षभर बोटिंग क्लब, जिम, लॉजिंग, हॉटेल्स, स्वीमिंग टॅँक अशा सर्वच व्यवस्था बंद होत्या. दरम्यान, कागलचा बोटिंग क्लब पूर्ववत सुरू करा, अशी पर्यटकांची आग्रही मागणी होती. हा बोटिंग क्लब पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र व्हावे म्हणून येथे नव्याने बाग-बगीचा, खाऊ गल्ली, ऑक्सिजनचे रंगीत कारंजे, म्युझिकल फाउंटेन आणि लेसर शो आदी सुविधा सीएसआर फंडामधून उभारल्या जातील. बोटिंग क्लबसह श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव या दोन्हीही ठिकाणी ओपन जिम उभारल्या जातील.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, आदिल फरास, संदीप कवाळे, चंद्रकांत गवळी, प्रकाशराव गाडेकर, रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, अमित पिष्टे, सतीश घाडगे, विवेक लोटे, माधवी मोरबाळे, अलका मर्दाने, शोभा लाड, पद्मजा भालबर, शाहीन अत्तार, रंजना सनगर, सागर गुरव, व्यवस्थापक अशकिन आजरेकर आदी प्रमुख उपस्थित होते. आभार नितीन दिंडे यांनी मानले.
चौकट
मंत्री मुश्रीफ यांनी काढले तिकीट
बोटिंगमधून फेरफटका मारण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी व्यवस्थापकाकडून तिकीट घेतले. याचा संदर्भ देत ते म्हणाले की, कोणीही येथे फुकट फेरफटका मारण्याबद्दल आग्रह करू नये. यशवंत किल्ला अमेझिंग पार्कही लवकरच सुरू केला जाईल.
०७ कागल बोटिंग क्लब
फोटो ओळी...... कागल -येथील तलावातील बोटिंग क्लबच्या बोटींचे जलावतरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनीही सहकाऱ्यांसह बोटिंगचा आनंद लुटला.