कागलचा सांस्कृतिक चेहरा ‘गांधी वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:33 AM2019-02-04T00:33:07+5:302019-02-04T00:33:13+5:30

वीरकुमार पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कागल म्हटले की राजकीय विद्यापीठ अशा एकाच अंगाने या शहराकडे पाहिले ...

Kagal's cultural face 'Gandhi Reading Room' | कागलचा सांस्कृतिक चेहरा ‘गांधी वाचनालय’

कागलचा सांस्कृतिक चेहरा ‘गांधी वाचनालय’

Next

वीरकुमार पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कागल म्हटले की राजकीय विद्यापीठ अशा एकाच अंगाने या शहराकडे पाहिले जाते; पण त्याला मोठा ऐतिहासिक वारसा जसा लाभलेला आहे, तसाच शतकोत्तर सांस्कृतिक चेहराही आहे. त्याची जडणघडण तत्कालीन ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’ने केली आहे. हीच लायब्ररी सध्या ‘महात्मा गांधी वाचनालय’ या नावाने ओळखली जाते. या संस्थेला तब्बल १३८ वर्षे पूर्ण झाली असून कागलमधील घराघरांत वर्षानुवर्षे वाचनाची आवड निर्माण करण्यात तिचा मोठा वाटा आहे.
ज्या काळात किमान लिहिता-वाचता येईल इतपत शिक्षण घेण्याकडेही लोकांचा कल नव्हता, त्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक तत्कालीन जहागीरदार जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे यांनी १२ नोव्हेंबर १८८० साली ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’ची स्थापना केली. त्याचा संपूर्ण खर्च जहागिरीतून देण्याचीही व्यवस्था केली. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे ज्या शाळेत गिरवले ते हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शहरात असल्याने त्या काळात शिकलेल्यांची संख्या इतर शहरांच्या मानाने चांगली होती. त्यांना वाचनासाठी साहित्य पाहिजे होतेच. यातूनच वाचन चळवळ सुरू होऊन शहराचा सांस्कृतिक चेहरा आकाराला आला. देश स्वतंत्र झाल्यावर २१ फेब्रुवारी १९४८ साली ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी’चे नामकरण ‘महात्मा गांधी वाचनालय’ असे झाले आणि ६ नोव्हेंबर १९५२ साली शासनाची मान्यता मिळाली. त्यावेळेपासून आजपर्यंत हे वाचनालय पुणे येथील सहायक ग्रंथालय संचालकांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.
सुरुवातीच्या काळात हे वाचनालय कोल्हापूर वेशीजवळ, त्यानंतर काहीकाळ बाजारपेठेतील म. फुले मार्केटमध्ये होते. त्याचवेळी १०० वर्षे पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र शासनाने पाच लाख रुपयांचा निधी दिला. त्यातूनच आता नगरपालिकेजवळ मुख्य रस्त्याला लागून असणारी इमारत बांधण्यात आली. मात्र, ही जागाही अपुरी पडू लागल्यावर नगरपालिकेने खर्डेकर चौकातील हिंदुराव घाटगे विद्यामंदिरमागे असलेली सध्याची इमारत उपलब्ध करून दिली.
येथे संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबरी, लघुकथा, प्रवासवर्णने, आत्मचरित्र, राजकीय लेखमाला यांसह महिला विभाग, बालविभाग अशी स्वतंत्र खुली मांडणी केल्यामुळे वाचकांना आवडीप्रमाणे पुस्तक पाहता येते. त्यातही वाचकांच्या आवडीनिवडी ओळखून येथील कर्मचारी हवी ती पुस्तके ताबडतोब देतात. यामुळेच येथील वाचकांची संख्या प्रत्येकवर्षी वाढतच आहे. यामुळे या वाचनालयाला नेहमी ‘अ’ दर्जा मिळत असून, शासनाने विशेष सन्मानपत्रही दिले आहे.
सुसज्ज अभ्यासिका
वाचनालयातर्फे २०१२ मध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली.
प्रत्येक वर्षी त्यांना आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ वाचनालय खरेदी करते. येथे सध्या २० पेक्षा अधिक विद्यार्थी अभ्यास करत आहेत. येथील काहीजणांची अधिकारीपदी निवड झाली आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या राज्याभिषेक
वर्णनाचे १८९६ सालचे पुस्तक
शाहू महाराज १७ मार्च १८८४ साली कोल्हापूरच्या गादीला दत्तक गेले आणि २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाचे वर्णन करणारे ‘मुक्त्यारी समारंभ’ या नावाचे पुस्तक पुढे दोनच वर्षांत १८९६ साली बाळाजी महादेव करवडे यांनी लिहिले. गद्य आणि पद्य रचनेतील हे अतिशय दुर्मीळ पुस्तक या वाचनालयात आहे.
दुर्मीळ ग्रंथसंपदा : येथे विनायक कोंडदेव ओक लिखित १८८९ सालचे ‘महन्मणिमाला’, देवराव उखा शेट येरंडोलकर यांचे भास्कराचार्यकृत अंकगणिताच्या मूळ संस्कृत पुस्तकाचे मराठी भाषांतरीत पुस्तक, रावजी श्रीधर गोंधळेकर यांचे १८७८ सालचे कीर्तनरंगी, गजानन चिंतामण देव यांचे १८६७ सालचे अहिल्याबाई होळकर, बाळाजी प्रभाकर मोडक यांचे १८८२ सालचे मुसलमानी राज्याचा इतिहास, आदी अनेक दुर्मीळ पुस्तके सुस्थितीत आहेत.
विविध उपक्रम
वाचनालयातर्फे ग्रंथ प्रदर्शन, विविध पुस्तकांवर चर्चासत्र आयोजित केले जाते. प्रत्येकवर्षी उत्कृष्ट वाचकाची निवड केली जाते. गणेश जयंतीनिमित्त व्याख्यानमाला घेतली जाते.
‘शाहू’कडून रॅकसाठी निधी
शाहू साखर कारखान्याने पुस्तके ठेवायला रॅक तयार करण्यासाठी मदत निधी दिला आहे.

Web Title: Kagal's cultural face 'Gandhi Reading Room'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.