कागलच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा २२ व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:18+5:302021-03-10T04:25:18+5:30
कागल : व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचे काम तसे सोपे नाही. एक तर ती व्यक्ती स्वतःच्या आत्मबलावर यातून ...
कागल : व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचे काम तसे सोपे नाही. एक तर ती व्यक्ती स्वतःच्या आत्मबलावर यातून बाहेर पडते. अथवा त्याच्यावर शास्त्रीय उपचाराची आवश्यकता असते. व्यसनाच्या गर्तेत सापडलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढून त्यांना व्यसनमुक्त करण्याचे काम गेली २२ वर्षे कागलमधील नवजीवन संस्था करीत आहे. नावा प्रमाणे नवजीवन प्राप्त करून हे लोक येथून बाहेर पडले आहेत.
कागल शहरात नवनवीन शैक्षणिक सुविधा निर्माण करणारे कै.वाय.डी माने आण्णा यांनी दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून १९९८ मध्ये अलका शेती फार्मच्या निसर्गरम्य वातावरणात हे केंद्र सुरू केले. पदरमोड करून चालवलेही. आज महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यसनमुक्ती केंद्र म्हणून नवजीवन संस्थेचा लौकिक झाला आहे. प्रामुख्याने दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना येथे उपचारासाठी सोडले जाते. वैद्यकीय उपचार आणि मानसोपचाराच्या माध्यमातून १०० टक्के व्यसनमुक्त करण्याचे काम केले जाते. व्यसनमुक्त होऊन गेलेल्या व्यक्तींशी पुन्हा पुढील वर्षभर संपर्क ठेवून त्याचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भय्या माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या डीन शिल्पा पाटील, प्रकल्प समन्वयक अक्षय पाटील आणि त्यांचे सहकारी या केंद्राचे काम पाहत आहेत.
● चौकटीत.
कागल सांगावं रस्त्यावर हे केंद्र निसर्गरम्य वातावरणात आहे. निवासाची, भोजनाची सोय आहे. ग्रंथालय, व्यायाम, योग, मनोरंजन, क्रीडासाहित्य अशा सुविधांबरोबर वैद्यकीय आणि मानसोपचार ही येथे केले जातात. शास्त्रीय पद्धतीने व्यसनमुक्तीचे उपाय येथे होतात.