कागलच्या नव्या जोडण्या--- ‘दादा, हे कंचं राजकारण म्हणायचं...!

By Admin | Published: April 28, 2015 12:45 AM2015-04-28T00:45:36+5:302015-04-28T00:47:52+5:30

समरजितसिंह-अमरीशसिंह भेटीने भूवया उंचावल्या ! सोशल मीडियावर रंगली चर्चा

Kagal's new connections - 'Dada, this crunch means politics ...! | कागलच्या नव्या जोडण्या--- ‘दादा, हे कंचं राजकारण म्हणायचं...!

कागलच्या नव्या जोडण्या--- ‘दादा, हे कंचं राजकारण म्हणायचं...!

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या राजकारणातून दहा वर्षांपासून एकमेकाला पाण्यात बघणारे कागलचे हे दोन नेते पुन्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रूही नसतो आणि मित्रही,’ असे म्हटले जाते. ते योग्यच आहे, पण आपल्या स्वार्थी राजकारणासाठी कार्यकर्त्यांना भडकावून डोकी फोडायला लावायची आणि पुन्हा त्याच स्वार्थासाठी गळ्यात गळे घालायचे, हे कोणत्या संस्कृतीत बसते, असेच राजकारण सध्या प्रा. संजय मंडलिक व हसन मुश्रीफ यांच्यात पाहावयास मिळत आहे. काल-परवापर्यंत एकमेकांचे तोंड न बघणारे नेते एकमेकांच्या कानाला लागलेले पाहून कागलच्या भाबड्या व कट्टर कार्यकर्त्यांचे डोळे विस्फारले आहेत. ‘दादा व साहेब हे कंचं राजकारण म्हणायचं...! ’अशी विचारणा कार्यकर्त्यांमधून केली जात आहे. नेत्यांचे राजकारण कसलेही असू दे कार्यकर्त्यांनो आता तुम्ही शहाणे व्हा व आपली डोकी सांभाळा, एवढेच म्हणावे लागेल.

समरजितसिंह-अमरीशसिंह भेटीने भूवया उंचावल्या !
सोशल मीडियावर रंगली चर्चा
कागल : कागल तालुक्याच्या राजकारणातील नव नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या समरजितसिंह घाटगे व अमरीशसिंह घाटगे सोमवारी सदिच्छा भेटीच्या निमित्ताने एकत्र आले आणि कागलकरांसह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या. या भेटीची सोशल मीडियावर मात्र दिवसभर चर्चा चांगलीच रंगली. जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी आमदार हसन मुश्रीफ व प्रा. संजय मंडलिक यांची झालेली भेट तालुक्यात चर्चेची ठरली असताना या दोन युवा नेत्यांच्या भेटीने त्यात भर टाकली आहे. त्यामुळे कागलच्या या नव्या जोडण्यां जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांना विचार करायला लावणाऱ्या ठरण्याची शक्यता आहे.
शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर प्रथमच चिरंजीव समरजितसिंह घाटगे यांनी सोमवारी कारखान्यात जाऊन सुत्रे स्वीकारली. ते यापूवीही कारखान्यात यायचे पण आता त्यांनी कारभार हाती घेण्यास वेगळी किनार आहे. ते दुपारी साडेबारा वाजता कारखान्यात आले. राजे ज्या दरबार हॉलमध्ये बसून कार्यकर्त्यांचे व ऊस उत्पादकांच्या अडचणी जाणायचे त्याच ठिकाणी त्यांनी बैठक घेतली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती. समरजितसिंह यांनी राजेंच्या खुर्ची शेजारी खुर्ची टाकून बसले तेव्हा अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले. एकूण वातावरण कमालीचे भावूक बनले. त्याचवेळी अमरीशसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांसमवेत येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची सोशल मिडियाने दखल घेतली व वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगू लागल्याचे दिसून आले. मंडलिक-मुश्रीफ व अमरीशसिंह-समरजितसिंह घाटगे या दोन्ही भेटींची छायाचित्रे आणि त्याबद्दलच्या कॉमेंटस् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत होत्या.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्त आमदार हसन मुश्रीफ आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यात झालेल्या चर्चेच्या वृत्ताने सोमवारी कागल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती. काहींनी या भेटीचे स्वागत केले तर काहींना हा प्रकार रूचला नाही. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळाल्या.

Web Title: Kagal's new connections - 'Dada, this crunch means politics ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.