कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:21 PM2021-12-20T17:21:33+5:302021-12-20T17:25:25+5:30

गेल्या निवडणूकीत पिंपळगांव (ता.कागल) येथील तळेकर म्हणून एकाच सभासदाचा अर्ज शिल्लक राहिल्याने तेवढ्यासाठी निवडणूक घ्यावी लागली होती व त्याचा कारखान्यास किमान २० लाखांचा फटका बसला होता.

Kagal's Shahu Sahakari Sugar Factory's five yearly election unopposed | कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

Next

कोल्हापूर : देशाच्या साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आज, सोमवारी बिनविरोध झाली. कारखाना बहुराज्यीय असल्याने येत्या शुक्रवारी (दि.२४) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

विरोधी आघाडीचे सर्वसाधारण गटातून तीन व संस्था गटात एक अर्ज शिल्लक राहिल्याने या निवडणूकीचे काय होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील सेवा संस्था गटातून घाटगे गटानेही अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर होणारी ही दुसरी निवडणूक असून या निमित्ताने समरजित घाटगे यांच्या नेतृत्वावरील विश्वासही दृढ झाला.

या निवडणुकीसाठी १५ जागांसाठी १११ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३० अर्ज पात्र ठरले. कारखान्यांकडे नोंदणी केलेला सर्व ऊस कारखान्यास गाळपासाठी घालणे व पाच वर्षे वार्षिक सभेला उपस्थिती या निकषांवर विरोधकांचे अर्ज छाननीत बाद झाले. गेल्या निवडणूकीत पिंपळगांव (ता.कागल) येथील तळेकर म्हणून एकाच सभासदाचा अर्ज शिल्लक राहिल्याने तेवढ्यासाठी निवडणूक घ्यावी लागली होती व त्याचा कारखान्यास किमान २० लाखांचा फटका बसला होता. आता तर घाटगे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात विधानसभा निवडणूक व त्यानंतरही जोरदार राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यामुळे कारखाना निवडणूकीचे काय होणार ही उत्सुकता होती.

शाहू कारखान्याचा नावलौकिक राज्यातच नव्हे तर देशात आहे. शिवाय तालुक्यातील घाटगे, सदाशिवराव मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे गटाचा आपापला साखर कारखाना आहे. या कारखान्यांच्या सत्तेमध्ये त्या त्या नेत्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था असो की विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत जरूर इर्षेने निवडणूक लढवावी परंतू साखर कारखान्यामध्ये एकमेकांच्या पायात पाय घालून सहकार कारखानदारी व पर्यायाने शेतकऱ्यांचेच नुकसान करू नये अशी भावना तालुक्यातील जनतेची होती. त्यातूनच नेत्यांवर ही निवडणूक बिनविरोध होण्यास दबाव तयार झाला.

मंडलिक गटाने दोन दिवसांपूर्वीच शाहू कारखाना व जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करावी अशी उघड भूमिका घेतली होती. त्यानुसार कागलचे राजकारण आकारास आले आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने गटागटामध्ये असलेल्या राजकीय संघर्ष काही प्रमाणात का असेना सौम्य होण्यास नक्कीच मदत होईल. सद्यस्थितीत तालुक्याच्या राजकारणाची शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे विरुध्द महाविकास आघाडीतील ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे गट अशी विभागणी झाली आहे.

Web Title: Kagal's Shahu Sahakari Sugar Factory's five yearly election unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.