कागलला सत्तेचा तिढा

By Admin | Published: February 24, 2017 12:08 AM2017-02-24T00:08:15+5:302017-02-24T00:08:15+5:30

राष्ट्रवादीची मुसंडी : सेनेने जागा राखल्या, ‘भाजप’च्या खात्यात भोपळा

Kagla's power struggle | कागलला सत्तेचा तिढा

कागलला सत्तेचा तिढा

googlenewsNext

कागल : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत कागल तालुक्यात राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या तीन, तर पंचायत समितीच्या पाच जागा जिंकत मुसंडी मारली आहे. गतवेळच्या सत्ताधारी शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या पाच जागा कायम राखल्या, तर तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या भाजपला खातेही खोलता आले नाही.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या आवारात सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्यांदा कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची मोजणी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे युवराज पाटील हे पंचायत समितीच्या उमेदवारांसह आघाडीवर असल्याचे वृत्त बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. त्यानंतर सिद्धनेर्ली जिल्हा परिषदेची मतमोजणी सुरू झाली. या ठिकाणी शिवसेनेचे अमरीश संजय घाटगे मोठे मताधिक्य घेऊन आघाडीवर होते. मात्र, बाहेर पिछाडीवर असल्याचे वृत्त पसरल्याने कार्यकर्ते स्तंभित झाले होते. पुन्हा खरा निकाल बाहेर आल्याने घाटगे समर्थकांनी जल्लोष सुरू केला. या दोन मतदारसंघाच्या निकालाने राष्ट्रवादी-शिवसेना समसमान झाले होते. यानंतर बोरवडे मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. उमेदवार वीरेंद्र मंडलिक हजर होते. त्यांच्यात आणि मनोज फराकटे यांच्यात अत्यंत चुरस झाल्याने या निकालाच्या आकडेवारीचा समर्थक आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्यातच गोंधळ उडाल्याने नेमका विजयी कोण? हे तासभर समजत नव्हते. शेवटी मनोज फराकटे, गणपतराव फराकटे गुलाल लावून येथे आल्यानंतर निकाल काय आहे, हे स्पष्ट झाले.
तीन मतदारसंघांच्या निकालानंतर चिखली जिल्हा परिषदेची मोजणी सुरू झाली; पण तोपर्यंत समर्थकांची संख्या कमी झाली होती. चिखली मतदारसंघ दोन्ही पंचायत समितींसह शिवसेनेने कायम राखला. राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांनी चांगली लढत दिली. चार जिल्हा परिषदेपैकी दोन जि. प. आणि पं. स.च्या चार-चार जागा अशीच विभागणी शिवसेना- राष्ट्रवादीत होती. त्यामुळे शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या कापशी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. येथे राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत यांनी बाजी मारली. मात्र, पं. स.ची जागा सेनेकडे गेली, तर माद्याळ गणात राष्ट्रवादीच्या ज्योती मुसळे ९० मतांनी विजयी झाल्या. यामुळे पाच-पाच असे बलाबल झाले आहे.

समसमान, पुढे काय?
पंचायत समितीत शिवसेनेला पाच, तर राष्ट्रवादीला पण पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती पद कोणाकडे? हा तिढा होणार आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला राखीव आहे. राष्ट्रवादीतून कसबा सांगावमधून राजश्री राजेंद्र माने या, तर शिवसेनेकडून मनीषा संग्राम सावंत, सेनापती कापशीतून कमल रघुनाथ पाटील या दावेदार विजयी झाल्या आहेत.

Web Title: Kagla's power struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.