राधानगरीत चांदण्यांच्या साक्षीने काजव्यांचा प्रकाशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 12:25 AM2017-05-27T00:25:51+5:302017-05-27T00:27:11+5:30
पर्यटकांची गर्दी : पावसाळ्यापर्यंत चालणार रोज महोत्सव
आॅनलाईन लोकमत/संदीप आडनाईक
कोल्हापूर : राधानगरी-काळम्मावाडीच्या जंगल परिसरात श्ुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्र्यत राज्यातून आलेल्या पर्यटकांनी विविध झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा चांदण्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सव अनुभवला. चित्रपट, मालिकेत दाखविण्यात आलेले हे चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांनी तुंबळ गर्दी राधानगरीत झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाउस पडेपर्यंत हा काजवा महोत्सव रोज चालणार आहे.
राधानगरी येथील बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत २६ मे पासून काजवा प्रकाशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा पवार यांच्या मातोेश्री आशाताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले.
सायंकाळी ७ ते रात्री १0 या वेळेत काजव्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची पदभ्रमंती, चांदण्या रात्री सहकुटूंब स्नेहभोजन, करमणुकीच्या अशा या काजवा महोत्सवात विविध ठिकाणहून आलेल्या पर्यटकांनी भाग घेतला आहे. पहिला पाउस पडेपर्यंत हा महोत्सव रोज अनुभवता येणार आहे.
जैवविविधेतमध्ये महत्वाच्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शुक्रवारी रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडयापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरित्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. निसर्गातील अत्यंत अद्भूत असा हा कीटक राधानगरीसारख्या जंगल परिसरात चमकताना आढळतो. दाजीपूर, राधानगरी, काळम्मावाडी जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवरच हा काजव्यांचा थवा पाहण्यास आढळतो. काजव्यांचा हा तात्पुरता आशियाना अतिशय देखणा आणि विलोभनीय दिसतो आहे.