कलनाकवाडीच्या दाईचा समाजसेवेचा अनोखा वसा
By admin | Published: March 30, 2016 11:32 PM2016-03-30T23:32:54+5:302016-03-30T23:49:38+5:30
संध्या महाजन यांचे कार्य : पाच वर्षांत ४२५ यशस्वी प्रसूती; दुर्गम भागात प्रामाणिकपणे सेवा
गारगोटी : प्रसववेदना सुरू झाल्यावर गर्भवती मातेला प्रथम आठवण येते ती परमेश्वराचीे; पण तिला अलगदपणे वेदनामुक्त करणारी दाई हीच खऱ्या अर्थाने परमेश्वर रूपाने तिच्यासोबत असते. दुर्गम भागात प्रसूती म्हणजे पुनर्जन्म समजले जाते. कलनाकवाडी (ता. भुदरगड) येथील आरोग्य सेविकेने पाच वर्षांत तब्बल ४२५ प्रसूती पूर्ण करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्या सेविकेचे नाव आहे संध्या बाळकृष्ण महाजन.
२0१२ पासून वैद्यकीय अधिकारी नसताना, सुसज्ज रुग्णालय नसताना, दुर्गम भागात प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या वृत्तीने ४२५ गर्भवती महिलांची प्रसूती केली. या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली आहे. डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी संध्या महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
कलनाकवाडी हे गाव जेमतेम दोन हजार ते अडीच हजार लोकवस्तीचे आहे. येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राद्वारे लसीकरण, जननी सुरक्षा योजना, संदर्भ सेवा, कुष्ठरोग, क्षयरोग, याबरोबर किरकोळ उपचार केले जातात. या ठिकाणी एक सेविका आणि एक अर्धवेळ परिचारिका नेमलेल्या आहेत. त्यांनी फक्त लक्षणांचा अभ्यास करून मडिलगे किंवा गारगोटी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवून देण्यापर्यंत सेवा बजावायची असते.
या उपकेंद्रात संध्या महाजन यांनी सेविका म्हणून २0१२ मध्ये जुलै महिन्यात सेवाभार स्वीकारला. त्यावेळी लक्ष्मीबाई कोळस्कर या अर्धवेळ परिचारिका होत्या. त्यांच्या मदतीने त्यांनी सुरुवातीला ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला २१ गरोदर मातांची प्रसूती केली. त्यानंतर अनुक्रमे सत्तर, एकशे तेरा, एकशे बावीस, तर सध्या मार्चअखेर नव्यान्नव. अशा आजअखेर चारशे पंचवीस प्रसूती केल्या. त्या गारगोटी येथे राहण्यास आहेत. रात्री अपरात्री कधीही नातेवाइकांचा फोन आला की तडक स्कूटीवरून कलनाकवाडी येथे पोहोचतात. रात्री उशिरा जावे लागले तर त्यांचे पती सोबत घेऊन जातात अन्यथा रुग्णाचे नातेवाईक आणण्यासाठी जातात. त्या दवाखान्यात येण्यापूर्वी वयोवृद्ध लक्ष्मीबाई हजर असतात. अतिशय चिकाटीने आणि गरोदर स्त्रीचे मनोधैर्य वाढवून त्या यशस्वीपणे प्रसूती करतात. एखाद्यावेळी जर काही अडचणींमुळे प्रसूती होण्यास बाधा येत असेल, तर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतात किंवा अॅम्ब्युलन्स बोलावतात. शासनाने रुणवाहिकेत वैद्यकीय अधिकारी ठेवल्याने तातडीने प्राथमिक उपचारास सुरुवात होते; पण असे प्रसंग क्वचित घडतात. त्याच्या या कामाची दखल घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी प्रस्तावित केले आहे.
केवळ पगारासाठी नव्हे, समाधानासाठी नोकरी
केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी न करता अहोरात्र समाजाची सेवा आणि पुनर्जन्मासारख्या अडचणीतून मातेला व बाळाला मुक्त करून मिळणाऱ्या पुण्यप्रद समाधानासाठी कसे जगावे हे शिकविणाऱ्या श्रीमती महाजन यांच्या अविरत कष्टाचा आदर्श इतरांना प्रेरणादायी आहे. पुरस्काराच्या यादीपर्यंत जाणाऱ्या अलीकडच्या काळातील त्या एकमेव आहेत. त्यांना सदैव साथ करणारे त्यांचे पती, परिचारिका, सर्व वैद्यकीय अधिकारी, ग्रामस्थ यांचे त्या ऋण व्यक्त करतात.