कळंबा ग्रामपंचायत आक्रमक; टोलवसुली थांबवली
By Admin | Published: June 17, 2014 01:21 AM2014-06-17T01:21:30+5:302014-06-17T01:21:30+5:30
पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली
कळंबा : कळंबा टोलनाक्यावर सायंकाळी पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली. सुरुवातीस कंपनीचे कर्मचारी रस्त्यावर बॅरेकेटस् लावून अरेरावीत टोलवसुली करत होते ही बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास येताच सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, दीपक तिवले, प्रकाश पाटील अन्य सहकारी मोठ्या संख्येने टोलनाक्यावर आले व त्यांनी वसुली बंद पाडली.
टोलनाका ग्रामपंचायत हद्दीत असून बॅरेकेटस् काढा व जबरदस्तीने टोलवसुली करू नका, असे त्यांनी सुनावले. यावर टोल कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर केल्याने वादाचा प्रसंग उद्भवला पण ग्रामपंचायतीच्या टोल केबिनवरील नोटिशीने व आक्रमक भूमिकेने नमते घेत टोलवसुली थांबवून ते केबिनजवळ निर्विकारपणे तटस्थ उभे होते. कळंबा ग्रामपंचायतीचे सर्व आक्रमक सदस्य मोठ्या जागरूकतेने दर तासाला टोलनाक्यावर भेट देत राहिल्याने टोलवसुली थांबवण्यात आली. यावेळी एक सपोनि, ९ पोलीस कर्मचारी व एसआरपी सेक्शन पोलीस बंदोबस्तासाठी होते, तर आयआरबीचे आठ कर्मचारी व दोन गार्ड टोलवसुलीसाठी कार्यरत होते.
पोलीस निवाऱ्याविना...
गेले आठ दिवस आयआरबीने कळंबा टोलनाक्यावर निवारा उपलब्ध करून न दिल्याने पोलिसांना मुलभूत गरजांसाठी वणवण करावी लागते. किलबिल हॉटेलचे चालक अमित साळोखे यांनी सामाजिक दातृत्व जपले. त्यामुळे हॉटेल परिसर व एका खताच्या दुकानाबाहेर वळकटी टाकून बाहेरगावच्या पोलिसांनी रात्र काढली. आता पावसाळ्यात काय, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. (वार्ताहर)