कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जॅमरच नाही, टीव्हीसाठी वारेमाप खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:20 PM2024-05-13T16:20:01+5:302024-05-13T16:23:30+5:30

नियोजन मंडळाकडून निधी घेणे गरजेचे

Kalamba Jail in Kolhapur has no jammer, wind measurement cost for TV | कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जॅमरच नाही, टीव्हीसाठी वारेमाप खर्च

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जॅमरच नाही, टीव्हीसाठी वारेमाप खर्च

सचिन यादव

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या दोन महिन्यांत मोबाइलने शंभरी पार केली आहे. कारागृहात संपर्काचे साधन असलेल्या मोबाइलवरुन कैद्यांचे जगभर होत असलेले संभाषण रोखण्यासाठी कारागृहात जॅमर यंत्रणा अत्यावश्यक आहे. मात्र, कळंबा कारागृहात ही यंत्रणा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. कारागृहात ठिकठिकाणी २०० जॅमरची गरज असून, त्यासाठी कारागृह प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याची गरज आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत १०० हून अधिक मोबाइल सापडले आहेत. त्याचे मूळ मालक अद्याप सापडलेले नाही. या मोबाइल प्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचे उघड झाल्याने ११ कर्मचाऱ्यांवर बडतर्फ करण्यात आले.

कारागृहात चोरट्या मार्गाने मोबाइल येत असले तरी त्यावरून होणारे संभाषण रोखण्यासाठी जॅमर यंत्रणा अत्यावश्यक आहे. त्यामुळे कारागृहाच्या आतील आवारातून एकही कैदी मोबाइलवरून संभाषण करू शकणार नाही. कारागृहात २१४० कैदी आहेत. एकूण ८ सर्कलमध्ये ४ ते ८ बॅरक आहेत. त्या बरॅकच्या ठिकाणी आणि मैदानातील काही जागेवर जॅमर यंत्रणा बसविल्यास मोबाइल संभाषण रोखू शकण्यास मदत होणार आहे.

सांगली कारागृहात २० जॅमर

सांगली येथील कारागृहात २० जॅमर नुकतेच बसविले आहेत. या ठिकाणी ४५० कैदी आहेत. जॅमर बसविल्यामुळे येथून जगाचा संपर्क पूर्णपणे थांबला आहे.

परिसराचा सर्व्हे गरजेचा

काही वर्षांपूर्वी कारागृहात जॅमरची व्यवस्था होती. मात्र, जॅमरमुळे अर्धा किलोमीटर परिसरातील मोबाइल नेटवर्कला अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्या वेळी परिसरातील रहिवाशांनी कळंबा कारागृहाच्या प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या वेळी ही यंत्रणा काही काळासाठी बंद केली. त्यानंतर मात्र जॅमरची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली नाही.

टीव्हीसाठी वारेमाप खर्च

राज्यातील कारागृहात आता नवीन टीव्ही संच आले आहेत. काही ठिकाणी जुने टीव्ही संच सुरू असतानाही नवीन टीव्ही संच बसविण्याचा घाट रचला गेला आहे. ज्या ठिकाणी जॅमरची गरज आहे, त्या ठिकाणी जॅमर दिले जात नाहीत. मात्र अन्य गोष्टीवर खर्च केला जात असल्याची चर्चा कारागृह प्रशासनात आहे.

हायटेक कैदी

कारागृहाच्या प्रशासनाला मूर्ख बनविण्यासाठी हायटेक कैदी आहेत. त्यासाठी ते स्वत:चे नावीन्यपूर्ण तंत्र वापरतात. जॅमर यंत्रणेच्या पुढील तंत्रज्ञान काही कैद्यांकडे आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

जॅमर यंत्रणेचा सांगलीत प्रयोग यशस्वी झाला आहे. कळंबा कारागृहात ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - विवेक झेंडे, अतिरिक्त अधीक्षक, कळंबा कारागृह

Web Title: Kalamba Jail in Kolhapur has no jammer, wind measurement cost for TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.