कोल्हापुरातील कळंबा कारागृह हाऊसफुल्ल; सांगलीतील १२० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 01:55 PM2024-07-27T13:55:18+5:302024-07-27T13:56:39+5:30
कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार
कोल्हापूर : सांगली जिल्हा कारागृहाला महापुराच्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तेथील १२० कैदी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले. गुरुवारी ८० आणि शुक्रवारी ४० कैदी कळंब्यात दाखल झाले.
कोल्हापूर, सांगली भागांत अतिवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बहुतांश नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. कृष्णा नदीच्या पाणीपातळीचा धोका सांगली जिल्हा कारागृह वर्ग- दोनला आहे. तो ओळखून कैद्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या कारागृहात कैद्यांची ४०० क्षमता आहे. पैकी १२० कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले आहेत. यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कारागृहात प्रवेश देण्यात आला. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी आहेत.
सांगली कारागृहाची दुमजली इमारत आहे. पाणीपातळी वाढल्यास उर्वरित कैद्यांच्याही स्थलांतराची शक्यता आहे. या कैद्यांसह कारागृहातील अन्नधान्य, कागदपत्रे, शस्त्रात्रे, दारूगोळाही सुरक्षित ठिकाणी हलविला असल्याचे सांगली कारागृहाचे अधिकारी महादेव होरे यांनी सांगितले.
२५ कैद्यांचे स्थलांतर
कळंबा कारागृहातील खून, जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या २५ कैद्यांना अन्य जिल्ह्यांतील कारागृहांमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यांना नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या कारागृहांत पाठविले आहे.
कळंबा कारागृह हाऊसफुल्ल
कळंबा कारागृहात कैद्यांची क्षमता १६९९ इतकी आहे. नव्याने दाखल झालेले १२० कैदी धरून २२२० कैदी कारागृहात आहेत. त्यामुळे कारागृह हाऊसफुल्ल झाले असून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार आहे.
सांगलीतून स्थलांतरित झालेल्या १२० कैद्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. त्यांना सध्या असलेल्या बरॅकमध्ये आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैद्यांची स्वतंत्र बरॅकमध्ये व्यवस्था केली आहे. - विवेक झेंडे, अधीक्षक, कळंबा कारागृह