कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांसाठी 'स्मार्ट कार्ड फोन' सुरू, आठवड्यात तीन कॉलची मुभा
By उद्धव गोडसे | Published: April 15, 2024 05:46 PM2024-04-15T17:46:18+5:302024-04-15T17:47:19+5:30
मोबाइलचा वापर रोखण्यास होणार मदत
कोल्हापूर : कारागृहातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकिलांशी संवाद साधता यावा, यासाठी ॲलन स्मार्ट कार्ड फोन योजना कळंबा कारागृहात सोमवारपासून (दि. १५) सुरू झाली. कारागृहातील २२१२ कैद्यांपैकी ५०९ कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध झाले असून, दहशतवादी आणि परदेशी कैदी वगळता उर्वरित कैद्यांसाठीही स्मार्ट कार्ड लवकरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे कारागृहात कैद्यांकडून छु्प्या पद्धतीने होणारा मोबाइलचा वापर रोखण्यास मदत होणार असल्याचा विश्वास कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी व्यक्त केला.
कारागृह प्रशासनाची नजर चुकवून काही कैदी मोबाइलचा वापर करतात. यातून कारागृहाची सुरक्षा धोक्यात येते. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी आणि वकिलांशी संवाद साधता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड फोन योजना सुरू केली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून ५०९ कैद्यांना स्मार्ट कार्ड दिली आहेत. यात कैद्यांनी दिलेले तीन मोबाइल क्रमांक आहेत. सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत यावर आठवड्यातून १८ मिनिटे बोलता येते. एकाच वेळी सलग १८ मिनिटे किंवा सहा मिनिटांच्या तीन टप्प्यात तीन वेगळ्या नंबरवरही बोलता येते. स्मार्ट फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे, त्यामुळे अधिका-यांना संशयास्पद संवादाची तपासणी करता येते.
संशयास्पद संवाद आढळल्यास त्याची फोन सुविधा बंद करून, संबंधित कैद्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली जाईल, अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली. कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनानुसार स्मार्ट कार्ड फोन योजना सुरू केल्याचे अधीक्षक शेडगे यांनी सांगितले.