कळंबा कारागृह अधीक्षक शेळके यांची तडकाफडकी येरवड्यात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:29+5:302020-12-26T04:19:29+5:30
कोल्हापूर : कळंबा कारागृहात फेकलेले दहा मोबाईल व गांजा प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची येरवडा कारागृहातील मुख्यालयात तडकाफडकी ...
कोल्हापूर : कळंबा कारागृहात फेकलेले दहा मोबाईल व गांजा प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची येरवडा कारागृहातील मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांचा पद्भार पुणे येरवडा येथील चंद्रमणी इंदुरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी शुक्रवारी दुपारी दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी खुद्द रामानंद हे शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात आले होते.
दीड महिन्यापूर्वी तिघा संशयितांनी चेंडू कापून त्यात गांजा भरला होता. ते तीन चेंडू कळंबा मध्यवर्ती कारागृहात फेकण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिसांनी त्या तिघांवर कारवाई केली. दरम्यान, कळंबा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी मध्यरात्री मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्यांची तीन पुडकी फेकली. त्यात पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल, दोन पेन ड्राईव्ह, चार चार्जर कॉड व चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण होते. एकाच वेळी कळंबा कारागृहात दहा नवे मोबाईल पोहचविण्याच्या झालेल्या प्रयत्नांची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. संपूर्ण कारागृहाची तपासणी करून याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेशही वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला देण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी खुद्द अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद हे शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात आले होते. त्यापूर्वी एकापाठोपाठ घडलेल्या प्रकारामुळे त्यांनी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पुणे येरवडा कारागृहातील मुख्यालयात बदली केली. त्यांच्या जागी पुणे येरवड्याचे उपअधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्याकडे कळंबा कारागृहाची सुत्रे देण्यात आली असल्याचे रामानंद यांनी सांगितले. याप्रकरणी विभागीय चौकशीस सुरुवात झाली असून, उपमहानिरीक्षक योगेश देसाई हेही शुक्रवारी सकाळपासून कळंबा कारागृहात तळ ठोकून आहेत, तर गुन्ह्यासंबधी चौकशी व तपासासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे तुरुंग नियमावलीनुसार विशेष अधिकारही प्रदान करण्यात आले. त्याकरिता तुरुंगामध्येच एक चौकशी कक्ष निर्माण केला आहे. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव या प्रकरणाचा तपास करणार आहेत. या दोन्हींचा अहवाल येत्या दोन आठवड्यात रामानंद यांच्यासह पोलीस महासंचालकांनाही सादर केला जाणार आहे. त्यात दोषी आढळणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीसी कायद्यानूसार पोलीस कारवाई करतील. तर कर्मचारी व अधिकारी दोषी आढळल्यास तुरुंग प्रशासनाच्या नियमावलीनुसार कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, अपर पोलीस महासंचालक (तुरुंग) रामानंद, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रभारी अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी जेथे हा प्रकार उघडकीस आला, त्या भिंतीलगतची पाहणी केली.
चौकट
भिंतीमागचा माणूस महत्वाचा
तुरुंगाच्या सुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञान, जादा मनुष्यबळ आदी देऊनसुद्धा ती चालवणाऱ्या मंडळींमध्येच काही दोष असल्यास त्याचा काही उपयोग होणार नाही. हे चालवणारा भिंतीमागचा माणूस महत्वाचा ठरतो. त्यामुळे पूर्वग्रह दूषित ठेवून मी कोणावरही कारवाई करणार नाही. तुरुंग उपमहानिरीक्षक याेगेश देसाई यांच्याकडे विभागीय चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. या अहवालातून दोषी आढळणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल. असेही अपर पोलीस महासंचालक (तुरुंग) रामानंद यांनी स्पष्ट केले.
फोटो : २५१२२०२०-कोल-कळंबा जेल
आेळी : कळंबा कारागृहात जेथून मोबाईल, गांजा अशा आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या, त्या भिंतींच्या परिसराची अपर पोलीस महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी पाहणी केली. यावेळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी अधिकारी उपस्थित होते.
फोटो : २४१२२०२०-कोल-चंद्रमणी इंदुरकर
येरवडा येथे बदली झालेले तुरुंग अधीक्षक शरद शेळके यांचा संग्रहीत फोटो वापरणे