ऐन पावसाळ्यातही कोल्हापुरातील कळंबा तलाव कोरडाच, अद्यापही पाणीपातळी चार फुटांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 05:05 PM2024-07-05T17:05:46+5:302024-07-05T17:06:15+5:30
कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने ...
कळंबा : गेल्या काही आठवड्यांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने बहुतांश बंधारे पाण्याखाली जाऊन बळिराजा सुखावला आहे. मात्र, शहरात पावसाने दडी मारून बरीच हुलकावणी दिल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. आजमितीला पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली असून, तलावपात्राचा वापर विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी होत आहे.
पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. तलावपात्रात निव्वळ डेड अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक असून, जलचरांच्या अस्तित्वासाठी ताे शिल्लक ठेवणे क्रमप्राप्त असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे करण्यात येणारा पाणी उपसा बंद केला आहे. कळंबा ग्रामपंचायती मार्फत होणारा एक एमएलडी पाणी उपसा बंद केला असून गावातील सार्वजनिक विहिरी बोअरवेलमधून पाणी उपसा करून गावची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे.
गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने एका आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यावेळी ग्रामस्थ तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तलावाचे मुख्य जलस्राेत असणारे सात नैसर्गिक नाले तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामात गडप केले असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. संबंधित प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची गरज निर्माण झाली आहे. -पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या, कळंबा