उष्म्यावर कलिंगडची थंडाई
By Admin | Published: February 15, 2015 11:32 PM2015-02-15T23:32:25+5:302015-02-15T23:46:52+5:30
गवारी तेजीत : महाशिवरात्रीनिमित्त शाबूदाणा, बटाटा, वरीच्या मागणीत वाढ
कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त शाबूदाणा, बटाटा, शेंगदाणे, वरी यासह उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली दिसते. गेले आठ दिवस उष्म्यात वाढ झाल्याने फळांच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. उष्म्यावर कलिंगडची थंडाई घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर काही प्रमाणात घसरले असले तरी गवारीचे दर वधारले आहेत. महाशिवरात्री उद्या, मंगळवारी असल्याने शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरी, गंगावेश बाजारात सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. विशेषत: रताळे, शाबूदाणा व वरीला मागणी होती. वरीचा प्रतिकिलो दर ७२ रुपये ते ८० रुपये, रताळे ४० रुपये, शाबुदाणा ७२ रुपये असा होता. तूरडाळीच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. ती ९२ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. बदाम-बी ८०० रुपयांवरून ८५० रुपयांच्या घरात गेली आहे. धान्य, तेलाचे दर स्थिर आहेत.
भाज्यांची आवक वाढल्याने कोबी, वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू मिरची, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, भेंडी, दोडका, फ्लॉवर या भाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीर स्थिर होती. घाऊक बाजारात कोथिंबीरचा दर ७०० रुपये (शंभर पेंढ्या) असा होता. मेथीची आवक घटली असली तरी ६०० रुपये (शंभर पेंढ्या) असा दर होता. रवे (गूळ) दरात प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढले आहेत. आवक वाढल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात ६०, तर घाऊक बाजारात ४५ रुपये झाली आहेत. प्रतिकिलोला २० रुपये कमी झाले आहे. (प्रतिनिधी)
काळ्या पाठीच्या कलिंगडची आवक
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने फळांना विशेष मागणी वाढली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडला ग्राहकांकडून मागणी जास्त होत आहे. या कलिंगडचा दर दहा रुपये तसेच पांढऱ्या पाठीचा दर २५ ते ३० रुपये असा होता. बाजारात कलिंगडच्या थप्पीच्या थप्पी लागल्या होत्या.
कांदा वाढला; लसूण स्थिर
गतआठवड्यापेक्षा या आठवड्यात कमी झालेल्या आवकेमुळे कांद्याच्या दरात वाढ झाली. दहा किलो कांद्याचा दर १४० रुपये झाला आहे. लसूण स्थिर असून, त्याचा प्रतिकिलो दर ४० रुपये असा होता.