काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना चार वर्षांनी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:12 PM2019-11-30T12:12:07+5:302019-11-30T12:14:42+5:30
संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर : परस्परांवर हितसंबंधाचा आरोप करत चार वर्षांपूर्वी दोन शकले झालेल्या काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतील नेत्यांना अखेर उपरती झाली आहे. दोघांनीही पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचे जाहीर करून येथून पुढे एकाच संघटनेच्या झेंड्याखाली धरणग्रस्तांना न्याय मिळवून देऊ, असे स्पष्ट केले आहे.
काळम्मावाडी धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार शंकर पाटील व रंगराव पाटील यांच्या नेतृत्वास स्थापन झालेल्या संघटनेत चार वर्षांपूर्वी उभी फूट पडली. गुंडोपंत पाटील व बाबूराव पाटील यांनी सवतासुभा मांडला. संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.
धरणग्रस्तांच्या बैठकीत ही घोषणा करून येथून पुढे एकत्रितपणे काम करू, असे या दोघांनीही जाहीर केले. काळम्मावाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही काही प्रमाणात रखडलेले आहे. शिवाय स्लॅब कमी करण्याच्या धोरणामुळे अजूनही काहीजणांना जमिनी मिळालेल्या नाहीत. ज्यांना जमिनी मिळाल्या आहेत, तेथेही ताब्यावरून वाद आहेत.
धरणग्रस्त वसाहतीमध्ये सुविधांचे प्रश्न गंभीर आहेत. याशिवाय धरणग्रस्त म्हणून दाखले आणि तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणेही अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघटना एकत्र येऊन पूर्वीप्रमाणे काम करणार असल्याने आता प्रश्न मांडण्याला जोर लागणार आहे.