Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:07 PM2024-03-27T16:07:57+5:302024-03-27T16:08:11+5:30
निविदेच्या टप्यातच शासनाकडून दिरंगाई
कोल्हापूर : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातील गळती काढण्याची निविदा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी येत्या पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे पाटबंधारे प्रशासनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.
राधानगरी तालुक्यात असणाऱ्या काळम्मावाडी धरणात २५.४० टीएमसी पाणीसाठा करता येतो. मात्र, दगड-मातीच्या असणाऱ्या या धरणाच्या पायामध्येही प्रचंड गळती आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकत नाही. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ८० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
धरणावर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण जिल्ह्यातील समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या कामाला निधी मिळवण्यासाठी शासकीय पातळीवर वजन वापरले. मात्र, निविदा निश्वित होऊन वर्कऑर्डर मिळण्याच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव शासकीय पातळीवर लालफितीत अडकला. परिणामी तातडीने काम सुरू होणार नाही.
आता लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. वर्कऑर्डर मिळाले तरी आचारसंहिता संपेपर्यंत गळतीच्या कामाचा प्रारंभ होणार नाही. ही सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत जून महिना उजाडणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर गळतीचे काम करणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.