Kolhapur: काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम दीड महिन्यात; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:42 PM2024-08-13T13:42:18+5:302024-08-13T13:42:45+5:30

पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता, तीन टप्प्यांत होणार काम

Kalammawadi dam leakage repair work in one and a half months; Tender process in final stage  | Kolhapur: काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम दीड महिन्यात; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

Kolhapur: काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम दीड महिन्यात; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, कागलसह कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या गळती दुरुस्तीच्या कामाला येत्या दीड महिन्यात सुरुवात होणार आहे. या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून, ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १२१ गावांमधील ४१ हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी धरणाला गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याविरोधात सर्वच स्तरातून आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये धरणाच्या गळती दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, गत सहा महिन्यांपासून यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता.

धरणातील सगळा पाणीसाठा संपल्यावर प्रशासन गळती काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात असल्याने पाटबंधारे विभागाला जाग आली असून, या दुरुस्तीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या २७ ऑगस्टपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल. या गळती दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.

पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता

  • दूधगंगा प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा २५ टीएमसीचा प्रकल्प आहे. या धरणावर जिल्ह्यातील तीन तालुक्यांसह बेळगाव जिल्ह्यातीलही शेती सिंचनाखाली आहे. शिवाय कोल्हापूर शहरासह अनेक छोट्या शहरांचा पाणीपुरवठा याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून या धरणाला मोठी गळती असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळतीमुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे गळती काढण्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार आवाज उठविला होता.
  • सध्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन टप्प्यांत हे काम हाती घेण्यात येणार आहे.


उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच

गतवर्षी १५ ऑगस्टला कोल्हापुरात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळा संपल्यानंतर धरणाची गळती काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता दुसरा पावसाळा संपत आला तरी या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली, तरी ज्या ठेकेदाराला हे काम मिळेल त्याच्याकडून तरी ते वेळेत पूर्ण केले जाईल का, याबाबतही सांशकता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीच याबाबत दबावगट तयार करून हे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.

दूधगंगा प्रकल्पाच्या गळती दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत हे दुुरुस्तीचे काम करण्यात येईल. - ए. एस. पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर.

Web Title: Kalammawadi dam leakage repair work in one and a half months; Tender process in final stage 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.