कोल्हापूरकरांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार, ‘थेट पाईपलाईन’चे काम ३१ मेपूर्वी होणे अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:18 PM2022-05-17T12:18:19+5:302022-05-17T12:24:06+5:30
योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या चाचणीकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
कोल्हापूर : शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी ३१ मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे योजनेचे ठेकेदार जीकेसी कन्स्ट्रक्शन यांनी उर्वरित कामासाठी आणखी सहा महिन्याची मुदत वाढवून मागितली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने २०१४ मध्ये वर्क ऑर्डर दिल्यापासून आतापर्यंत ठेकेदाराला काम करण्याकरिता चारवेळा मुदतवाढ दिली आहे. आता पाचव्यांदा मुदतवाढ मागितली आहे. योजनेच्या कामांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडून परवानगी मिळण्यात झालेला उशीर तसेच कोरोना संसर्ग व लॉकडाऊन यामुळे दोन वर्ष काम बंद राहिल्यामुळे योजनेचे काम रखडले आहे.
दि. ३१ मेपूर्वी काम पूर्ण करावे म्हणून ठेकेदारावर प्रशासनाकडून दबाव टाकला जात होता. प्रत्येक आठवड्याला बार चार्टप्रमाणे काम झाले की नाही, याची छाननी केली जात होती. गतवर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडत राहिल्याने कामात व्यत्यय आला. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारीपासून कामाने गती घेतली आहे.
दोन जॅकवेलसह इन्स्पेक्शन वेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ४६ मीटर उंचीचे दोन जॅकवेल आता ४० मीटर उंचीपर्यंत पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे जॅकवेलची कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. सध्या कामाची गती वाढली असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे.
चाचणीलाच लागणार तीन महिने
योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या चाचणीकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. निविदेतील अटीनुसार ५२ किलोमीटरच्या जलवाहिनीची चाचणी दोनवेळा करावी लागणार आहे. त्याकरिता तीन महिने लागणार आहेत.
- काळम्मावाडी थेट पाईपलाईन कामाची स्थिती
- पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण
- ५२ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण
- स्काडाचे काम पूर्ण, लवकरच टेस्टिंग करणार
- बीपीटी टँकचे काम पूर्ण, पायऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात
- जलवाहिनीवर ७२ व्हॉल्वपैकी ५० व्हॉल्व बसविले
- धरण क्षेत्रातील ४६ मीटर उंचीच्या जॅकवेलचे काम ४० मीटरपर्यंत पूर्ण.
- उर्वरित काम मेअखेर पूर्ण करण्याचे नियोजन
- ३३ केव्ही ट्रान्समिशन लाईन २७ कि.मी.पैकी १९ कि.मी.पर्यंतचे काम पूर्ण
- जॅकवेल पूर्ण झाल्यानंतर पंप बसविणार