कोल्हापूरकर! ‘काळम्मावाडी’चे पाणी सप्टेंबर महिन्यात ‘थेट’ तुमच्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:57 PM2023-08-22T16:57:37+5:302023-08-22T16:59:17+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येणार असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम गतीने सुरू असून, एक एक महत्त्वाचे टप्पे ...

Kalammawadi Direct Pipeline Scheme Water directly in Kolhapur in the month of September | कोल्हापूरकर! ‘काळम्मावाडी’चे पाणी सप्टेंबर महिन्यात ‘थेट’ तुमच्या दारात

कोल्हापूरकर! ‘काळम्मावाडी’चे पाणी सप्टेंबर महिन्यात ‘थेट’ तुमच्या दारात

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येणार असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम गतीने सुरू असून, एक एक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सप्टेंबर अखेर सर्व कामे पूर्ण होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी या योजनेद्वारे मिळेल, असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जॅकवेलवर पाणी उपसा करणारे चार पंप बसविण्यात आले, त्याची चाचणीही झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आमदार सतेज पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदाराचे प्रतिनिधी, सल्लागार कंपनीची अधिकारी उपस्थित हाेते.

दोन्ही जॅकवेलची कामे पूर्ण होऊन त्यावर पाणी उपसा करणारे चार पंपदेखील बसविण्यात आले आहेत. काळम्मावाडीपासून पुईखडीपर्यंत टाकण्यात आलेल्या ११०० एम. एम. जाडीच्या ५२ किलोमीटर जलवाहिनीपैकी ३३ किलोमीटरपर्यंत जलवाहिनीची पाणी वाहून नेण्याची क्षमता चाचणी पूर्ण झाली आहे. व्हाॅल्व्ह सेट न केल्यामुळे एका ठिकाणी मागच्या आठवड्यात गळती लागली. त्यामुळे सर्वच्या सर्व ७२ व्हॉल्व्हची एकदा तपासणी करून घ्या, मगच जलवाहिनीची चाचणी घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढचे सर्व व्हॉल्व्ह तपासणी करण्याकरिता आठ दिवस लागतील. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी सुरू केली जाईल. परंतु, ही कामे पुढील महिन्याभरात पूर्ण होतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

‘अमृत’च्या ठेकेदारास सूचना

या योजनेचा एक भाग असलेल्या अमृत योजनेतील शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याचे तसेच शहराच्या विविध ठिकाणी पाण्याच्या १२ टाक्यांचे काम अपूर्ण आहे. मी स्वत: संबंधित ठेकेदाराशी चर्चा केली आहे. त्यांनी चार महिन्यांची मुदत मागितली आहे. परंतु, आम्ही तोपर्यंत थांबणार नाही. हे काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या ज्या अंतर्गत जलवाहिनी वापरात आहेत, त्याद्वारे काळम्मावाडीचे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुन्या जलवाहिनीवरून घरोघरी पाणी देऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या जलवाहिन्यांचा वापर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

काहीही करून सप्टेंबर अखेर कोल्हापूरकरांना काळम्मावाडी धरणाचे थेट पाइपलाइनने पाणी देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कामाची गती वाढविण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. जॅकवेल, पंप जोडणी, जलशुद्धिकरण केंद्र, ५२ किलोमीटरची जलवाहिनी, दोन किलोमीटर अंतराची लाईन वगळता वीज कनेक्शनची २४ किलोमीटरची लाईन ओढणे अशी कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत पाणी देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Kalammawadi Direct Pipeline Scheme Water directly in Kolhapur in the month of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.