काळम्मावाडी गळती दुरुस्ती प्रक्रिया अडकली आचारसंहितेत, निधी मंजूर तरीही कामाला ‘खो’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:38 PM2024-11-08T13:38:06+5:302024-11-08T13:38:38+5:30

निवडणुकीनंतर मिळणार गती 

Kalammawadi leak repair process stuck in code of conduct, work lost even though funds are approved | काळम्मावाडी गळती दुरुस्ती प्रक्रिया अडकली आचारसंहितेत, निधी मंजूर तरीही कामाला ‘खो’

काळम्मावाडी गळती दुरुस्ती प्रक्रिया अडकली आचारसंहितेत, निधी मंजूर तरीही कामाला ‘खो’

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या प्रक्रियेला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आड आली आहे. या कामाची निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात मुंबईत बैठक होणार होती, परंतु काही कारणांमुळे ही बैठक झालीच नाही. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मंजूर निधीच्या कामाला ‘खो’ बसला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आणि भुदरगड तालुक्यांतील १२१ गावांमधील ४६ हजार ९४८ हेक्टर क्षेत्राला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. २५.३९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून कर्नाटक राज्यालाही ४ टीएमसी पाणी दिले जाते. परंतु या धरणातून रोज ३५० लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे २०२२ मध्ये हे धरण ७५ टक्के भरले होते. गळती काढण्यासाठी धरणाच्या काही भागात दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी ऑक्टोबर २०२३ मध्येच मंजूर केला आहे. ही गळती काढण्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला. 

मात्र, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही मुदत १३ मार्चला संपली आहे.या निविदांचे तांत्रिक मूल्यांकनही पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य अभियंता यांच्याकडून मान्यताही मिळालेली आहे. मात्र, व्यावसायिक निविदा बाकी आहे. या गळती दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच गळतीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी धडपडत होते. मात्र, आता निवडणुकीच्या निकालानंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

Web Title: Kalammawadi leak repair process stuck in code of conduct, work lost even though funds are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.