‘काळभैरी’ची पालखी चारचाकीतून डोंगरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:00+5:302021-03-01T04:29:00+5:30
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांसह गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरी देवाची पालखी दरवर्षी मोठ्या मिरवणुकीने डोंगरावरील मंदिरात जाते. परंतु, कोरोनाच्या ...
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांसह गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरी देवाची पालखी दरवर्षी मोठ्या मिरवणुकीने डोंगरावरील मंदिरात जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक यात्रा रद्द झाल्यामुळे यंदा प्रथमच ‘श्री’ची पालखी सजविलेल्या चारचाकी गाडीतून डोंगरावर नेण्यात आली. आज, सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र, कोरोनामुळे शुक्रवार(दि.५)अखेर मंदिर व परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
दुपारी सव्वातीन वाजता शहरातील शिवाजी चौकातील काळभैरी मंदिरात प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व आरती झाल्यानंतर ‘श्री’ची पालखी सजविलेल्या गाडीतून डोंगराकडे रवाना झाली. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, खातेदार यशवंत पाटील यांच्यासह हक्कदार व मानकरी उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुरगूडहून श्री काळभैरीची पालखी येथील डोंगरावरील मंदिरात आली. त्यानंतर दोनही पालख्यांसह मंदिराला प्रदक्षिणा काढण्यात आली. मध्यरात्री प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते ‘श्रीं’ची शासकीय पूजा झाली.
दरवर्षी शासकीय पूजेनंतर ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शन आणि मंदिरापासून एक किलोमीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. डोंगरावरील मंदिराच्या कमानीजवळ आणि हडलगे फाट्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काळभैरी मार्गे असणारी वाहतूक पर्यायी वडरगे, कडगांव आणि शेंद्री या मार्गावरून सुरू राहणार आहे.
----------------------------------
* ‘चांगभलं’चा गजर घुमलाच नाही
* दरवर्षी यात्रेच्या आदल्या दिवशी शहरातील मंदिरापासून डोंगरावरील मंदिरापर्यंत पालखी सवाद्य मिरवणुकीने जाते. दरम्यान, हजारो भाविक पालखीला गोंडे बांधतात. मोठ-मोठे गोंड बांधण्यासाठी तरुण मंडळांमध्ये मोठी चढाओढ असते. गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजरात होणारा हा पालखी सोहळा नयनरम्य असतो. परंतु, कोरोनामुळे यात्राच रद्द झाल्यामुळे यंदा ‘चांगभलं’चा गजर घुमलाच नाही.
----------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सजविलेल्या वाहनातून श्री काळभैरी देवाची पालखी डोंगरावरील मंदिराकडे पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २८०२२०२१-गड-०५