कळे पोलीस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: February 9, 2015 11:23 PM2015-02-09T23:23:52+5:302015-02-09T23:59:16+5:30
मुहूर्त सापडेना : ५४ गावांच्या सुरक्षेसह तक्रारींसाठी ७० ते ८० किलोमीटरची फरफट थांबवण्याची मागणी
सरदार काळे - कळे -कळे (ता. पन्हाळा) येथील नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी अधिसूचना निघाली असूनही ते सुरू करण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पोलीस ठाण्याच्या इमारतीसह सर्व बाबींची पूर्तता झालेली असतानाही ते अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी याबाबत विशेष लक्ष घालून विभागातील सुमारे ५४ गावांच्या सुरक्षेसह तक्रारींसाठी पन्हाळा येथे ७० ते ८० किलोमीटरवर फरफटत जाण्याचा वनवास संपवावा, अशी मागणी कळे विभागातील सामान्य जनतेतून होत आहे.
कळे हे पश्चिम पन्हाळ्यातील केंद्रस्थ गाव आहे. या ठिकाणी १९५४ पासून दूरक्षेत्र पोलीस चौकी आहे. या पोेलीस चौकीशी पन्हाळा पश्चिम भागासह धामणी खोरा व डोंगराळ भागातील ५४ गावे, २२ वाड्या जोडलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कळे गाव हे अतिमहत्त्वाचे असून, या केंद्रापासून काही गावे सुमारे ६५ कि.मी.वर आहेत. वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण दुर्गम व डोंगराळ भाग आणि जवळून जाणारे दोन राज्यमार्ग यांचा विचार केल्यास कळे येथे पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, जनतेच्या मागण्या आणि वृत्तपत्रांतून अनेकवेळा दाखवून दिलेली गरज, याचा विचार करून कळे येथील स्वतंत्र पोलीस ठाण्याला २०१२ साली शासनाकडून तत्वत: मंजुरी मिळाली. २०१३ मध्ये याबाबत शासन निर्णय झाला. सप्टेंबर २०१४ मध्ये याबाबत शासन अधिसूचनाही निघाली; पण अद्याप कळे येथे पोलीस ठाणे सुरू झालेले नाही.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, नवीन पोलीस ठाण्यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुखांशी चर्चा करून लवकरात लवकर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते; पण या घोषणांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
पोलीस ठाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा या राज्यमार्गालगतच सुमारे दहा हजार चौ. फु. क्षेत्राची सुसज्ज भाड्याची इमारत आहे. या इमारतीत पोलीस कोठडी, अधिकारी व ठाणे अंमलदार केबीन, संगणक व वायरलेस कक्ष, गोपनीय विभाग, क्राईम व बारनिशी विभाग, कारकून विभाग, आदींची सोय होण्याइतपत खोल्या आहेत. तसेच आवश्यक फर्निचरही आहे. शिवाय कोकण विभागाकडे लक्ष ठेवण्याचे हे मोक्याचे ठिकाण आहे. अशा सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या इमारतीस पोलीस ठाण्याचा दर्जा मिळावा व आवश्यक ती कर्मचारी संख्या उपलब्ध व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
कळे परिसरात काही गावे संवेदनशील आहेत. वाढती गुन्हेगारी, वाहतूक सुरक्षा, अवैध धंदे यांच्यावर आळा बसण्यासाठी पश्चिम पन्हाळा विभागात कळे येथे पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
- मारुती गुरव, गावकामगार पोलीसपाटील, सावर्डे तर्फ असंडोली.