आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:59+5:302021-01-03T04:24:59+5:30
आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी ...
आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा
नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रनगरीचा विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी धडपडण्याऐवजी मंजूर झालेल्या एखाद्या कामाचे श्रेय घेण्यातच धडपड सुरू आहे. मंजूर झालेले हे काम माझ्यामुळेच झाले, असा दावा करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. विकासकामांच्या श्रेयवादात रंगलेल्या व्यक्तींच्या ताब्यातच इचलकरंजीची नगरपालिका आहे. तेथील ‘कारभारा’विषयी मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातो. याकडे पाहताना खरच शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.
शहराचा विकास होण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांसह नगरपालिकेचा कारभार यांच्या संयुक्त सामंजस्यातून राज्य, तसेच केंद्र शासनाकडे संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु, इचलकरंजीतील राजकारण वेगळ्याच वळणावर निघाले आहे.
अशा शह-काटशहाच्या नीतीमुळे विकासकामांना गती मिळण्याऐवजी खीळ बसत चालली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे खोळंबली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इचलकरंजीला मंजूर झालेले आरटीओ कार्यालय. त्यावेळी या कामामध्येही सुरुवातीला श्रेयवाद रंगला. त्यानंतर शह-काटशहाचे राजकारण झाले आणि मंजूर झालेले एम-५० हे आरटीओ कार्यालय कऱ्हाडला वर्ग झाले. त्याचबरोबर काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन , वारणा योजना एकूणच इचलकरंजीचा पाणीप्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा सर्व प्रश्नांवर शहरातील सर्व राजकीय व्यक्तींनी आपापल्यापरीने एकत्रित प्रयत्न केले असते, तर शहराचा नक्कीच विकास झाला असता.
निवडणुकीच्या काळात श्रेयवाद, आरोप-प्रत्यारोप करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट -
शहराच्या राजकारणाचे मंत्र्यांकडे रडगाणे
आमदार प्रकाश आवाडे यांनी यापूर्वी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री इचलकरंजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही राजकारण वातावरण तापले होते. त्यानंतर आता श्रेयवाद रंगला. त्यामुळे अमूक विकासकामे आपल्याचमार्फत झाले असल्याचे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणासोबत झालेला पत्रव्यवहार दाखविला पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे, अशा भावनेतून स्थानिक नेते मंत्र्यांकडे रडगाणे मांडतात. त्यातून शहरातील असले राजकारण सर्वदूर पोहोचते, याचेही भान आवश्यक आहे.