काेल्हापूर चिडीचूप, रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:20+5:302021-05-17T04:21:20+5:30

कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. उद्योगांची धडधड थांबली. बाजारपेठेतील गोंगाट शांत झाला. ...

Kalhapur Chidichup, roads deserted | काेल्हापूर चिडीचूप, रस्ते निर्मनुष्य

काेल्हापूर चिडीचूप, रस्ते निर्मनुष्य

googlenewsNext

कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. उद्योगांची धडधड थांबली. बाजारपेठेतील गोंगाट शांत झाला. भाजी मंडईतील लगबग बंद पडली. अवघे रस्ते निर्मनुष्य झाले. दिवसभर केवळ सोसाट्याचा वारा आणि अधून मधून पडणाऱ्या पावसानेच काय तो लॉकडाऊनमधील उदासपणा कमी करण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे संक्रमण खूपच वाढले असून रोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ते दीड हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही अधिक स्पष्ट झाल्या असून रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांकरिता कडकडीत लॉकडाऊन पुकारला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूरकर शनिवारी रात्री घरी पोहोचले ते रविवारी पुन्हा बाहेर पडलेच नाहीत. पोलिसांनी शहरातील चौका चौकांचा, प्रमुख रस्त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे नेहमीची धावपळ, बाजारपेठेतील, भाजी मंडईतील गर्दी, रस्त्यावरील वर्दळ दिसलीच नाही. रस्ते निर्मनुष्य झाले. चौक सुने सुने झाले. सर्वत्र स्मशान शांतता निर्माण झाली.

महानगरपालिकेची पथके आणि पोलिसांनी रविवारी सकाळी सहा वाजल्यपासून शहरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. महापालिका पथके मार्केट यार्ड तसेच जेथे भाजी मंडई भरते त्या परिसरात गस्त घालत होती. पोलीस रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून चौकशी करत होते. निष्कारण रस्त्यावर आलेल्या व्यक्तींची वाहने काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात होती. तर सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या व्यक्तींची रवानगी थेट पोलीस ठाण्यात होत होती.

शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग कडकडीत बंद असताना पेट्रोल पंप व दूध वितरण, औषध दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होती. पेट्रोलपंप जरी सुरू असले तरी ग्राहकच नसल्याने त्यांच्या विक्रीवर कमालीचा परिणाम झाला. शहरातील बस, ऑटोरिक्षा वाहतूक बंद होती. मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळा बस स्थानक परिसर सुने सुने दिसत होते. एक प्रकारची भयाण शांतता होती.

-जोरदार वारा अन‌् पावसाचा खेळ -

कोल्हापुरात रविवारी दिवसभर जोरदार वारा आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे शहरातील लॉकडाऊनमधील उदासपणा कमी झाला. निर्मनुष्य रस्त्यावर वाऱ्या आणि पावसात पोलिसांचा खडा पहारा होता, महापालिका पथकांची गस्त सुरू होती.

Web Title: Kalhapur Chidichup, roads deserted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.