कलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:23 PM2020-02-17T15:23:47+5:302020-02-17T15:25:46+5:30
उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत.
कोल्हापूर : उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत.
फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी जाणवत होती, मात्र गेली चार-पाच दिवस उष्मा वाढत आहे. त्यामुळे शीतपेये, फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे कलिंगडांना मागणी असताना आवक त्या प्रमाणात नाही. हिरव्या पाटीची कलिंगडे अद्याप दिसत नाहीत.
काळ्या पाटीची कलिंगडे बाजारात आली असून, ३० ते ५० रुपये एका कलिंगडाचा दर आहे. स्थानिक काकडीची आवक वाढली असून, ४० रुपये किलो दर आहे. त्याशिवाय द्राक्षे, सफरचंद, चिक्कू, संत्र्यांची आवक चांगली आहे. द्राक्षाची आवक तुलनात्मक वाढली असली तरी गोडीला कमी असल्याने उठाव होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात ८० ते १०० किलो दर राहिला आहे.
उन्हाचा तडाका वाढत असला तरी भाजीपाल्याच्या दरात घसरण दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किलो मागे पाच ते दहा रुपये कमी झाले आहेत. स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
हिरवागार एक किलो कोबीचा गड्डा दहा रुपये, वांगी २० रुपये किलो आहे. ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचा दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. कोथिंबिरीची पेंढी १० रुपये झाली असून, मेथी, पालक, पोकळ्याचा दर स्थिर आहे.
तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली असून, किलोमागे सरासरी दहा रुपये कमी झाले आहेत. इतर डाळींचे दर कायम असले तरी पांढरा वाटाण्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सरकी तेल, शेंगदाणा, शाबू आदींचे दर स्थिर राहिले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले असून, घाऊक बाजारात सरासरी १५ रुपये, बटाटा १८ रुपये, तर लसूण १४० रुपये किलो राहिला आहे.
टोमॅटो पुन्हा मातीमोल!
मध्यंतरी टोमॅटोचा दर काहीसा वधारला होता. मात्र या आठवड्यात तो पुन्हा घसरला आहे. घाऊक बाजारात २ ते ५ रुपये दर असून, किरकोळ बाजारात दहा रुपयाला सव्वा किलो टोमॅटो आहे.
‘ब्याडगी’, ‘गंटुर’ तेजीत
लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, दर चांगलाच तेजीत आहे. ‘ब्याडगी’, ‘गंटुर’ला आपल्याकडे मागणी अधिक असते. त्याचे दर अनुक्रमे प्रतिकिलो २४० व १८० रुपये आहे. सध्या कर्नाटकातून मिरचीची आवक सुरू असून, आंध्रप्रदेशमधून आवक सुरू झाल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.