‘काळम्मावाडी’तील पाण्याचे नियोजन हवे
By admin | Published: March 16, 2017 01:01 AM2017-03-16T01:01:25+5:302017-03-16T01:01:25+5:30
काटकसरीची गरज: १३.२९ टीएमसी पाणीसाठा
निवास पाटील ल्ल सोळांकूर काळम्मावाडी प्रकल्पाच्या दूधगंगा धरणात आजअखेर गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा म्हणजे १३.२९ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाळ्यास तब्बल ३ ते ४ महिन्यांचा अवधी असल्याने पाण्याच्या नियोजनाचे वेळापत्रकानुसार वापर काटसकरीने होणे आवश्यक आहे.
गतवर्षी पावसाने प्रमाणापेक्षा कमी हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मृत साठ्यातील पाण्याचा वापर करूनदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाण्याअभावी पिके होरपळली होती. उसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. गतवर्षी पाण्याच्या नियोेजनाचे वेळापत्रक कोलमडले होते. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना संबंधित विभागाची दमछाक झाली.
आजअखेर धरणात १३.२९ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ५.९१ टी.एम.सी. इतका पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक पाणी असले तरी पाण्याची वाटप प्रक्रिया अधिक होणार आहे. कोल्हापूर थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात येत असल्याने शहरास पाणीपुरवठा केला जाणार आहे. डाव्या व उजव्या कालव्यांतर्गत ओलितास येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. कर्नाटकला चार टी.एम.सी. पाणी देणे बंधनकारक आहे. याचा विचार करता भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी बचत व नियोजन होणे आवश्यक आहे.
डाव्या व उजव्या कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याने कालव्यांना गळती लागली असून, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कालव्यातून ४५० ते ५०० क्युसेस दाबाने पाणी सोडूनदेखील काही अंतरावर पाण्याचा दाब हा १०० क्युसेस असतो. भविष्यात होणाऱ्या पर्जन्यमान व पाणी वाटप प्रक्रियांचा विचार करून पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज आहे.
गतवर्षीचा विचार करता राधानगरी, तुळशी, वारणा यांचा उपयुक्त जलसाठा पाहिल्यास पावसाचे आगमन उशिरा झाले, तर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. राधानगरी परिसरात वृक्षतोड झाल्याने पर्जन्यमान कमी होऊ शकते, असे ज्येष्ठ व्यक्तींचे मत आहे.
धरणाचे नाव आजचा पाणीसाठागतवर्षीचा पाणीसाठा
टीएमसीटीएमसी
१)राधानगरी३.१८३.२६
२)तुळशी२.१४१.६९
३)वारणा१४.४६१२.३७
४)दूधगंगा१३.२९५.९१