कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:06 PM2018-03-17T18:06:35+5:302018-03-17T18:06:35+5:30
फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामार्फत (इंटरनॅशनल स्पेस युनिर्व्हसिटी -आयएसयू) कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिची प्रतिष्ठेच्या कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारी ती यावर्षीची जगातील एकमेव विद्यार्थिनी आहे.
कोल्हापूर : फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामार्फत (इंटरनॅशनल स्पेस युनिर्व्हसिटी -आयएसयू) कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिची प्रतिष्ठेच्या कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारी ती यावर्षीची जगातील एकमेव विद्यार्थिनी आहे.
२३ वर्षीय अनिशाने कोल्हापूरात केआयटी कॉलेजमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. २५ जून ते २४ आॅगस्ट या कालावधीत नेदरलँड येथे होणाऱ्या ३१ व्या वार्षिक अंतराळ संशोधन कार्यक्रमात ती सहभागी होत असून तीन डच अंतराळ संस्थेमार्फत हा कार्यक्रम होत आहे.
१४ मार्च रोजी आयएसयू या संस्थेकडून अनिशाला ही शिष्यवृत्ती मिळाल्याचे पत्र मिळाले. पुण्यातील एका संस्थेमार्फत अनिशाने अवकाश शास्त्रासंदर्भात एक निबंध लिहिला होता. त्यानंतर आयएसयू या संस्थेने तिची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली. १८.५00 युरो पैकी अनिशाला १७ हजार ५00 युरोंची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय संस्थेच्या समितीने घेतल्याचे तिला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयएसयू या संस्थेमार्फत दरवर्षी अवकाश संशोधन कार्यक्रमातंर्गत जगभरातील एका विद्यार्थिनीची कल्पना चावला शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येत असते. अवकाश संशोधन या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रोत्साहन देणे हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. यापूर्वी अमरावतीच्या सोनल बाभरवाल या विद्यार्थिनीला या शिष्यवृत्तीचा सन्मान मिळाला होता.
भारतीय वंशाच्या अवकाश शास्त्रज्ञ कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कल्पना चावला यांचा १ फेब्रुवारी २00३ मध्ये कोलंबिया यान दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
कल्पना चावला आणि एपीजे अब्दुल कलाम हे माझे आवडते शास्त्रज्ञ आहेत. कल्पना चावला यांच्या नावे मिळालेली शिष्यवृत्ती ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला नासा किंवा इसा (युरोपियन स्पेस एजन्सी) या अवकाश संस्थेसाठी काम करण्याची इच्छा आहे.
अनिशा अशोक राजमाने,
कोल्हापूर.