कार्यकर्त्यांचा कल्पवृक्ष लोकनेते सदाशिवराव मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:56+5:302021-03-10T04:24:56+5:30
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नेतृत्वाच्या साखळीतील राजकारणाचा वापर कष्टकरी, श्रमिक, शेतकरी आणि जनसामान्यांच्या हितासाठी करणाऱ्या नेतृत्वापैकी दिवगंत ल़ोकनेते सदाशिवराव मंडलिक ...
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नेतृत्वाच्या साखळीतील राजकारणाचा वापर कष्टकरी, श्रमिक, शेतकरी आणि जनसामान्यांच्या हितासाठी करणाऱ्या नेतृत्वापैकी दिवगंत ल़ोकनेते सदाशिवराव मंडलिक हे एक असामान्य नेतृत्व होते. १० मार्च २०१५ रोजी हे कार्यकर्तृत्वाचे वादळ शमले. गेल्या पन्नास वर्षांपासून वटवृक्षाप्रमाणे असणारी छाया गायब झाल्याने कार्यकर्तेही कासावीस झाले आहेत. लोककल्याणाचा ध्यास घेऊन समाजकारण आणि राजकारणाची पायवाट मळविणाऱ्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे आज तृतीय पुण्यस्मरण करताना त्यांच्या देदीप्यमान कार्यकर्तृत्वाला दिलेला उजाळा...
१० मार्च... असा शब्द जरी मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांच्या कानावर पडला तरी त्यांच्या हृदयात चर्रर होते. तो दिवस या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस ठरला. लोककल्याणाचा ध्यास घेऊन निरपेक्ष भावनेतून मनुष्यरूपी एक-एक बिंदू जोडून लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे घट्ट जाळे विनले आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्यासह राज्यामध्ये पुरोगामी विचारांचे करारी आणि कणखर व्यक्तिमत्त्व असणारे नेतृत्व उदयास आले. ७ ऑक्टोबर १९३४ रोजी मुरगूड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण जडले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे आकर्षण वाटणाऱ्या मंडलिक यांना कोणताही राजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळही नव्हते. तरीही जनसामान्यांच्या भरभक्कम पाठबळ आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात उडी घेतली. १९६७ मध्ये ते बिद्री-बोरवडे जि.प. मतदारसंघातून निवडून आले. यावेळी ते जि.प.च्या बांधकाम समितीच्या सभापतीही झाले.
बांधकाम सभापती असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. हा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. मात्र, ते असफलच ठरले. त्यानंतर १९७२ च्या विधान सभेसाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. मात्र, काँग्रेसने ती नाकारली; परंतु रणभूमीवर माघार घेतील ते मंडलिक कसले. त्यांनी सामान्य, गोरगरीब, शेतकरी आणि काही युवकांना संघटित करून लढाईचे रणशंख फुंकले. ‘एकला चलो रे’चा नारा देत त्यांनी बंडखोरी केली. यावेळी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. कागलच्या जनतेनेही या लढवय्या नेतृत्वाला सलाम करत त्यांना संधी देण्याची खून गाठ बांधली. यावेळी झालेल्या विजयानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९७२, १९८५, १९९०, १९९५ मध्ये चार वेळा, तर १९९८ ते २००९ पर्यंत सलग चार वेळा त्यांना लोकसभेत पाठविले.
दरम्यान, चार माणसं घरी आल्यानंतर त्यांना दोन घास खाऊ घालण्याची ऐपत नसताना राजकारणात उडी घेऊन बलाढ्य शक्ती बरोबर झुंज द्यायची, सातत्याने संघर्षमय जीवन जगायचे, आर्थिकदृष्ट्या फाटक्या माणसांचे नेतृत्व करायचे आठ ते दहा निवडणुका लढवायच्या कधी, सत्ताधाऱ्यांबरोबर, तर कधी स्वकीयांशी तर कधी गटांतर्गत संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. मात्र, १० मार्च २०१५ हा कागलच्या राजकीय पटलावर काळा दिवसच उगवला. यादिवशी संघर्षाचे अंतहीन वादळ शमले होते. त्यांचा झालेला अंत कोल्हापुरातील लढवय्या कार्यकर्त्यांना सहन न होणाराच होता. मंडलिकांची ही पोकळी भरून न येणारी ठरली आहे. आजही त्यांच्या कार्यपद्धतीची पदोपदी आठवण येत राहते अशा या दिव्यत्व लाभलेल्या मंडलिकरूपी असामान्य व्यक्तिमत्त्वाला सलाम करावा तितका थोडाच ठरावा...!!
प्रेरणादायी कार्य
स्व. मंडलिकांनी दुधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून कागल तालुक्यात हरित क्रांती साधली, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कारखान्याची उभारणी केली. सहवीज, इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीचा मनोदय केला. त्यानुसार सहवीजची उभारणी त्यांच्या हयातीतच झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. तर इथेनॉल उभारणीसह ग्राहक संस्थेची उभारणी करून प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, तसेच सर्वच कार्यकर्ते मंडलिकांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. स्व. मंडलिकांच्या आठवणी आणि त्यांचे विचार भावी पिढीलाही प्रेरणादायी ठरावेत यासाठी कारखाना कार्यस्थळावर शेतकरी, सभासद व कार्यकर्ते या सर्वांच्या सहयोगातून स्व. मंडलिकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे हा कारखाना परिसर सर्वांसाठी प्रेरणास्थळ ठरत आहे.
-बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर
उपाध्यक्ष, सदासाखर