शिवरायांच्या पुतळ्यासाठी कळविकट्टी-मनगुत्ती दांडी मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:09 PM2020-08-26T13:09:15+5:302020-08-26T13:12:29+5:30
बेळगाव जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा दिलेला शब्द पाळून तातडीने पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसविला जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.
गडहिंग्लज : बेळगाव जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा दिलेला शब्द पाळून तातडीने पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसविला जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.
मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गावातील एका गटाच्या विरोधामुळे पंधरा दिवसापूर्वी चबुतऱ्यावरून उतरविण्यात आला. त्यामुळे चबुतऱ्याच्या जागेवर धरणे आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला होता.
त्यावेळी बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रेड्डी यांच्या उपस्थितीत मनगुत्तीमध्ये झालेल्या बैठकीत १५ दिवसात पुन्हा पुतळा बसविला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, पुतळा न बसविल्यामुळे शिवसैनिकांनी कळविकट्टी ते मनगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढला.
कर्नाटक पोलिसांनी मनगुत्ती गावच्या वेशीवरच मोर्चा अडवला. त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, संघटक संग्राम कुपेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांची भाषणे झाली. हुक्केरीचे तहसिलदार अशोक गुराणी व मंडल पोलिस निरीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, राजेंद्र पाटील, भरत जाधव, प्रतीक क्षीरसागर, मंजित माने, भिकाजी हळदकर, उत्तम पाटील, दिनेश कुंभीरकर आदींसह सीमाभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संयुक्त बैठक बोलवा
शिवरायांचा पुतळा पुर्नप्रतिष्ठानेसाठी कर्नाटक-महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, सीमाभागातील खासदार, बेळगाव व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि मनगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनहट्टी या गावातील लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
गनिमी काव्यानेच धडक
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी, निपाणी, संकेश्वरसह मनगुत्तीकडे जाणाऱ्या सीमाभागातील रस्त्यावर कर्नाटक पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. त्यामुळे कोल्हापूरहून आलेल्या शिवसैनिकांनी कागल-निढोरी मार्गे गडहिंग्लजला येवून तेरणी-कळविकट्टी मार्गे महाराष्ट्राच्या हद्दीतूनच मनगुत्तीपर्यंत धडक मारली. मनगुत्ती गावात येणाऱ्या सर्व मार्गांसह संपूर्ण गावात कर्नाटक पोलिसांचा तर कळविकट्टी येथे महाराष्ट्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
पुतळ्याचा प्रस्तावच नाही
शिवरायांचा पुतळा उतरवल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर मनगुत्ती येथील शिवाजी चौकातील त्या जागेवर म. बसेवश्र्वर, छ. शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, वाल्मिकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. परंतु, त्यासंदर्भातील प्रस्ताव बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे अद्याप न गेल्यामुळेच पुतळ्यासंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे तहसिलदारांनी यावेळी आंदोलकांना सांगितले.